जिला
मुंबई-नांदेड विमानसेवा नियमित करा!: खा. अशोकराव चव्हाण
नागरी उड्डयन राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची घेतली भेट

नांदेड, दि. ३ ऑगस्ट २०२६:
मुंबई-नांदेड-मुंबई मार्गावरील विस्कळीत विमानसेवेमुळे प्रवाशांचे हाल होत असून, ही सेवा नियमित करण्याची मागणी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभा खासदार अशोकराव चव्हाण यांनी केली आहे. त्यांनी आज संसदेत केंद्रीय नागरी उड्डयन राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेऊन त्यांना यासंदर्भात सविस्तर पत्र दिले.
खा. अशोकराव चव्हाण यांनी केंद्रीय राज्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, सध्या या महत्त्वाच्या मार्गावर आठवड्यातून केवळ दोनच दिवस विमानसेवा उपलब्ध आहे. त्यातही गेल्या तीन आठवड्यांपासून अनेकदा विमाने रद्द होण्याचे प्रकार घडले आहेत. या अनियमिततेमुळे नांदेडला ये-जा करणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल होत असून, त्यांना नाहक आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे.
नांदेड शहराचे ऐतिहासिक, व्यावसायिक आणि धार्मिक महत्त्व लक्षात घेता, देश-विदेशातून येथे येणाऱ्या भाविकांची आणि प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्यामुळे मुंबई-नांदेड मार्गावर प्रवाशांची कायम मोठी संख्या असते. मात्र, सध्याची कमी क्षमतेची आणि कमी फेऱ्यांची विमानसेवा वाढत्या प्रवासी संख्येसाठी अपुरी पडत आहे. त्यामुळे या मार्गावर ‘एअर इंडिया’ किंवा ‘इंडिगो’ यांसारख्या प्रमुख विमान कंपन्यांमार्फत ‘बोईंग’ किंवा ‘एअरबस’सारखी अधिक प्रवासी क्षमता असलेली मोठी विमाने दररोज चालवण्यात यावीत, अशी मागणी खा. अशोकराव चव्हाण यांनी केली आहे. तसेच या मार्गावरील विमानसेवा प्रादेशिक संपर्क योजनेत समाविष्ट करावी, जेणेकरून सर्वसामान्यांना हा विमान प्रवास परवडणारा ठरेल, असेही त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.



