नांदेड जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती ऑनलाइन मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाला गती

नांदेड, 1- मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत नांदेड जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना डिजिटल पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उपक्रमाला मोठी गती मिळाली आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या संकल्पनेतून एकाचवेळी सर्व ग्रामपंचायतींना विनामूल्य वेबसाईट प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणात जिल्ह्यातील ग्रामपंचायत अधिकारी तसेच संगणक चालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
प्रशिक्षणाचे मार्गदर्शन निडली ॲपचे भुतडा यांनी केले. आतापर्यंत सातशेहून अधिक ग्रामपंचायतींनी स्वतःची संकेतस्थळे सुरू केली असून जिल्ह्याच्या विकास प्रवासातील हा ऐतिहासिक टप्पा ठरला आहे.
गावांची वेबसाईट ही केवळ ऑनलाइन ओळख न राहता गावाच्या सर्वांगीण प्रगतीचे द्योतक ठरेल. यावर गावाची मूलभूत माहिती, शासकीय योजना व त्यांचे लाभार्थी यांची यादी प्रकाशित होणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायत कामकाज पारदर्शक होईल तसेच नागरिकांना माहिती एका क्लिकवर मिळेल, असे मत मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी व्यक्त केले.
या अभियानात शंभर गुणांचे मूल्यांकन होत असून प्रत्येक गुणाला महत्त्व आहे. संकेतस्थळासाठीही गुण दिले जाणार असल्याने प्रत्येक ग्रामपंचायतीने उपक्रम प्रामाणिकपणे राबवावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली व उपमुख्य कार्यकारी अधिकारी डी.बी. गिरी यांनी केले.



