मुख्यमंत्री महोदयांच्या शंभर दिवसाच्या उपक्रमात नांदेड जिल्हा परिषदेची उल्लेखनीय कामगिरी विभागात नांदेड जिल्हा अव्वल

नांदेड,6- मुख्यमंत्री महोदयांच्या शंभर दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत नांदेड जिल्हा परिषदेत सात कलमी उपक्रम प्रभावीपणे राबवले जात आहेत. या उपक्रमांमधील नाविन्यपूर्ण प्रयत्नांबद्दल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी छत्रपती संभाजीनगर येथे विभागीय कार्यालयात सादरीकरण केले. या उपक्रमात नांदेड जिल्हा विभागात अव्वल ठरला आहे.
शंभर दिवसांच्या या उपक्रमात संकेतस्थळ अद्यावत करणे, स्वच्छता, तक्रार निवारण, कार्यालयीन सुविधा, तसेच क्षेत्रीय भेटी यावर विशेष भर दिला जात आहे. या अंतर्गत जिल्हा परिषदेने संकेतस्थळ अद्यावत केले आहे. जिल्ह्यातील 16 पैकी 5 पंचायत समित्यांना आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे. उर्वरित पंचायत समित्यांसाठीही आयएसओ मानांकन मिळवण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली जात आहे.
स्वच्छता उपक्रमांतर्गत प्रत्येक आठवड्याला सर्व शासकीय कार्यालयांमध्ये विशेष स्वच्छता मोहीम राबवली जात असून, ही मोहीम अनेक कार्यालयांमध्ये पूर्णत्वास आली आहे. नागरिकांच्या तक्रारींचे तातडीने निवारण करण्यासाठी आपले सरकार व सीएम पोर्टलवरील तक्रारींचे वेळोवेळी परीक्षण करून त्यांचे निराकरण केले जात आहे. आतापर्यंत प्राप्त 1 हजार 16 तक्रारींपैकी 916 तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत. नागरीकांच्या सोयीसाठी जिल्हा परिषद मुख्यालय व पंचायत समित्यांमध्ये अभ्यागतांना भेटींसाठी ठराविक दिवस व वेळ निश्चित करण्यात आले आहे. त्या संदर्भातील सूचना फलकही कार्यालयांच्या दर्शनी भागात लावण्यात आल्या आहेत.
प्रशासन सक्षम व पारदर्शक करण्यासाठी जिल्हा परिषदेत नवे तंत्रज्ञान अवलंबण्यात येत आहे. कागदपत्रांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी क्युआर कोड आधारित ट्रॅकिंग प्रणाली, कर्मचारी उपस्थितीसाठी बायोमेट्रिक प्रणाली तसेच जिल्ह्यातील 1 लाख 20 हजार विद्यार्थ्यांच्या शिक्षण व्यवस्थेवर थेट देखरेख ठेवण्यासाठी डिजिटल ट्रॅकिंग प्रणालीही कार्यान्वित करण्यात आली आहे. याशिवाय क्षेत्रीय कार्यालयांना भेटी अंतर्गत जिल्हा परिषदेच्या विभागप्रमुख प्रत्येक बुधवार व गुरुवारी पंचायत समित्यांना भेटी देऊन योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेत आहेत.
विषेत: योजनांची अंमलबजावणी कमी असलेल्या गावांवर लक्ष केंद्रित करून जल जीवन मिशन, प्रधानमंत्री आवास योजना व स्वच्छता अभियानाच्या कामांना गती देण्यात येत आहे. प्रशासन अधिक कार्यक्षम करण्यासाठी जिल्हा परिषद अंतर्गत सर्व कार्यालयात भरलेली व रिक्त पदांवरील माहितीसाठी जिल्हा परिषद मॉनेटरींग सिस्टिम प्रणाली विकासीत केली आहे. यामध्ये सर्व विभागातील विकास कामांची माहिती मिळणार असून विकास कामांच्या योजनांची अंमलबजावणी अधिक काटेकोरपणे करता येणार आहे. अशा विविध उपक्रामाच्या सादरीकरणात नांदेड जिल्हा विभागात अव्वल ठरला आहे.



