BHMS-CCMP डॉक्टरांच्या संघर्षाला यश : MMC कडे स्वतंत्र नोंदणीची सुरुवात.

नांदेड दि.५ महाराष्ट्रातील होमिओपॅथिक क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक असा निर्णय आज प्रत्यक्षात आला असून BHMS व CCMP पदवीधारक डॉक्टरांसाठी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल (MMC) अंतर्गत स्वतंत्र नोंदणी प्रक्रियेला अधिकृतपणे प्रारंभ झाला आहे. या प्रक्रियेअंतर्गत पहिले डिजिटल नोंदणी प्रमाणपत्र (CCMP/00001/2026) यशस्वीरीत्या निर्गमित करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या तरतुदीनुसार आणि Schedule 28 अंतर्गत CCMP पदवीधारक डॉक्टरांसाठी स्वतंत्र रजिस्टर तयार करण्यात आले आहे. या निर्णयाला मा.उच्च न्यायालयाचे आदेश, शासनाचे राजपत्र अधिसूचना तसेच शासन निर्णय (दि. 03 ऑगस्ट 2026) यांचा कायदेशीर आधार मिळाला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या कायदेशीर लढ्याला अखेर यश मिळाले असून राज्यभरातील होमिओपॅथिक डॉक्टरांच्या एकजुटीचा, चिकाटीचा आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांचा हा परिपाक मानला जात आहे. या निर्णयामुळे मॉडर्न फार्माकोलॉजी अंतर्गत वैद्यकीय सेवा देण्याचा मार्ग अधिक सुलभ, कायदेशीर आणि मजबूत झाला आहे.हा विजय केवळ काही व्यक्तींचा नसून महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात रुग्णसेवा देणाऱ्या प्रत्येक होमिओपॅथिक डॉक्टरांच्या सामूहिक प्रयत्नांचा परिणाम असल्याची भावना वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त होत आहे.
या ऐतिहासिक टप्प्यामुळे भविष्यात होमिओपॅथिक क्षेत्राला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.या यशस्वी घडामोडीबद्दल डॉ.प्रवीण खिल्लारे,डॉ. गजानन राठोड,डॉ.कैलास कंधारकर यांच्यासह राज्यातील सर्व BHMS व CCMP डॉक्टरांनी शासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे आणि शासनाप्रती आपले आभारही व्यक्त केले आहेत.



