माळटेकडी–देगलूर नाका रेल्वे उड्डाणपुलाच्या दुरुस्तीला सुरुवात
रऊफ जमीनदार यांनी प्रशासन पाठपुरावा केलेला कामाला यश

नांदेड : माळटेकडी ते देगलूर नाका दरम्यानच्या रेल्वे उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे काम अखेर सुरू झाले असून, हे काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली आहे.
या पुलाच्या दुरुस्तीबाबत राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी (शरद पवार)चे जिल्हाध्यक्ष शहर शेख रऊफ शेख पाशा जमीनदार यांनी यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे विविध पत्रांद्वारे पाठपुरावा केला होता. त्यांनी १ जुलै २०२४, १५ ऑक्टोबर २०२५, १४ नोव्हेंबर २०२५ आणि २४ जून २०२६ रोजी पत्रव्यवहार करून पुलाच्या दुरुस्तीची मागणी केली होती.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पत्रानुसार, या दुरुस्तीच्या कामाला १७ नोव्हेंबर २०२५ रोजी तांत्रिक मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग, नांदेडच्या कार्यकारी अभियंत्यांनी कार्यारंभ आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार माळटेकडी ते देगलूर नाका रेल्वे उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे काम सध्या सुरू असून ते वेळेत पूर्ण करण्यात येणार असल्याचे सहाय्यक अभियंता, श्रेणी-१, सार्वजनिक बांधकाम उपविभाग (उत्तर), नांदेड यांनी कळविले आहे.
पुलाच्या दुरुस्तीचे काम प्रत्यक्ष सुरू झाल्याने परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला असून, पाठपुराव्याला यश आल्याची प्रतिक्रिया शेख रऊफ शेख पाशा जमीनदार यांनी व्यक्त केली.
पत्रव्यवहाराचा सातत्यपूर्ण पाठपुरावा
पुलाच्या दुरुस्तीची मागणी सातत्याने लावून धरत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा करण्यात आला होता. तांत्रिक मान्यता आणि कार्यारंभ आदेशानंतर आता प्रत्यक्ष दुरुस्तीचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे कामाची गुणवत्ता राखून ते निर्धारित वेळेत पूर्ण करण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.



