SGGSच्या ‘ए कॅप स्पॉट राउंड’वर माजी सैनिकाचा आक्षेप
मुलीला डिफेन्स कोट्यातील प्रवेशापासून वंचित ठेवल्याचा दावा; चौकशी करून न्याय देण्याची मागणी

नांदेड : श्री गुरु गोबिंदसिंगजी (SGGS) अभियांत्रिकी महाविद्यालयात १४ सप्टेंबर रोजी झालेल्या ‘ए कॅप स्पॉट राउंड’ प्रवेश प्रक्रियेत डिफेन्स कोट्यातील जागेबाबत कथित अनियमितता झाल्याचा आरोप माजी सैनिक संतोष सुभाषराव हंबर्ड यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला. गुणवत्ता क्रमवारीनुसार पात्र असूनही आपली मुलगी ममता हंबर्ड हिला उपलब्ध जागेवर प्रवेश देण्यात आला नसल्याचा दावा त्यांनी केला.
हंबर्ड यांच्या म्हणण्यानुसार, ‘ए कॅप स्पॉट राउंड’ प्रक्रिया सुरू होण्यास झालेल्या विलंबामुळे तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. ममता हंबर्ड ही निर्धारित वेळेत महाविद्यालयात उपस्थित असतानाही तिला डिफेन्स कोट्यातील जागेपासून वंचित ठेवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
प्रवेश प्रक्रिया पारदर्शक आणि नियमानुसार झाली आहे की नाही, याची सखोल चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, तसेच मुलीला तिच्या पात्रतेनुसार न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी हंबर्ड यांनी केली. या प्रकरणी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक तसेच सैनिक कल्याण कार्यालयाकडे तक्रारी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेत अंतिम गुणवत्ता यादी, डिफेन्स प्रमाणपत्र तसेच इतर संबंधित कागदपत्रांची माहिती माध्यमांसमोर सादर करण्यात आली. प्रवेश प्रक्रियेत नियमांचे पालन झाले नसल्यास संबंधितांची जबाबदारी निश्चित करून योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
न्याय न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा
मुलीला तिचा शैक्षणिक हक्क मिळाला नाही तर SGGS महाविद्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा संतोष हंबर्ड यांनी दिला. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून विद्यार्थिनीला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी माजी सैनिक रामराव थडगे, तुषार देशमुख, माजी सैनिक गणेश बेंदरीकर, संजय जाधव, संजय चव्हाण आदी उपस्थित होते.



