देगलूर नाका परिसरात प्रतिबंधित गुटखा व सुगंधी तंबाखूचा साठा जप्त; एकाविरुद्ध गुन्हा दाखल
इतवारा पोलिसांची धडक कारवाई; १ लाख ६ हजार २८४ रुपयांचा मुद्देमाल जप्त

नांदेड | प्रतिनिधी – नांदेड शहरातील देगलूर नाका परिसरात प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि सुगंधी तंबाखूचा साठा केल्याप्रकरणी इतवारा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. तुराब नगर येथील सिटीझन गल्ली परिसरात छापा टाकून पोलिसांनी १ लाख ६ हजार २८४ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त केला असून, याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नांदेड जिल्ह्यात अवैध गुटखा, पानमसाला आणि सुगंधी तंबाखूची वाहतूक व विक्री करणाऱ्यांविरुद्ध पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
याच मोहिमेअंतर्गत ११ ऑक्टोबर २०२६ रोजी इतवारा पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक हद्दीत गस्त घालत असताना, देगलूर नाका परिसरातील तुराब नगर येथील सिटीझन गल्लीमध्ये एका घरात विक्रीच्या उद्देशाने प्रतिबंधित गुटख्याचा साठा करून ठेवल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचांच्या उपस्थितीत संबंधित ठिकाणी छापा टाकला. यावेळी साजीद खान इता खान (वय ३५ वर्षे), व्यवसाय मजुरी, याच्या घराची झडती घेतली असता विविध कंपन्यांचा प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि सुगंधी तंबाखूचा साठा आढळून आला.
या कारवाईत विमल पानमसाला, सागर पानमसाला, एसआर-१ सुगंधी तंबाखू आणि मुसाफिर पानमसाला यांसह एकूण १ लाख ६ हजार २८४ रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
या प्रकरणी इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३३६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम १२३, २७४ व २७५ तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियमातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची साठवणूक आणि विक्री करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी सुरू केलेल्या या मोहिमेमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. शहरात अशा प्रकारच्या अवैध विक्रीवर आळा घालण्यासाठी पोलिसांची कारवाई महत्त्वपूर्ण ठरत आहे.



