अनुसूचित जमातींच्या विकासाची श्वेतपत्रिका जाहीर करण्यासाठी आंदोलनाची हाक
तरतूद, खर्च, लाभार्थी व प्रत्यक्ष लाभाची अधिकृत माहिती जाहीर करण्याची मागणी

नांदेड : महाराष्ट्रातील अनुसूचित जमातींच्या विकासासाठी शासनाकडून करण्यात येणारी आर्थिक तरतूद, प्रत्यक्ष खर्च, विविध योजना, लाभार्थी आणि त्यांना मिळालेला प्रत्यक्ष लाभ याची अधिकृत माहिती जनतेसमोर आणावी, या मागणीसाठी आदिवासी कोळी महादेव समाज, नांदेड जिल्ह्याच्या वतीने आंदोलनाची भूमिका जाहीर करण्यात आली आहे.
अनुसूचित जमातींच्या विकासाशी संबंधित शिक्षण, शिष्यवृत्ती, वसतिगृह, आश्रमशाळा, रोजगार, जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रक्रिया तसेच संबंधित न्यायालयीन निकाल याबाबत पारदर्शक आणि अधिकृत माहिती उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
प्रमुख मागण्या
महाराष्ट्रातील अनुसूचित जमातींच्या विकासाची सर्वसमावेशक श्वेतपत्रिका जाहीर करावी, जनगणनेपासून प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंतची अधिकृत आकडेवारी जनतेसमोर आणावी, अनुसूचित जमातींसाठी करण्यात आलेली आर्थिक तरतूद आणि प्रत्यक्ष झालेला खर्च जाहीर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रक्रियेची पारदर्शक आकडेवारी प्रसिद्ध करावी, संबंधित समित्यांचे निर्णय आणि न्यायालयीन निकालांचा अधिकृत तुलनात्मक अहवाल जाहीर करावा, तसेच श्वेतपत्रिका तयार करण्याची प्रक्रिया आणि त्यासाठीची कालमर्यादा स्पष्ट करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.
‘तरतूद किती, खर्च किती; लाभार्थी किती आणि प्रत्यक्ष लाभ किती?’
अनुसूचित जमातींच्या विकासासाठी शासनाची नेमकी तरतूद किती आहे, त्यापैकी किती निधी प्रत्यक्ष खर्च झाला, किती लाभार्थी आहेत आणि त्यांना प्रत्यक्ष किती लाभ मिळाला, याची अधिकृत माहिती जनतेला मिळाली पाहिजे, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली.
योजनांच्या अंमलबजावणीत नेमक्या अडचणी कुठे आहेत आणि न्यायालयीन निकालांनंतर संबंधित प्रक्रियेत कोणते बदल झाले, या प्रश्नांचीही अधिकृत उत्तरे शासनाने जनतेसमोर ठेवावीत, अशी मागणी करण्यात आली.
हे आंदोलन कोणत्याही व्यक्ती, अधिकारी किंवा राजकीय पक्षाविरुद्ध नसून पारदर्शकता, सामाजिक न्याय, शासकीय उत्तरदायित्व आणि घटनात्मक हक्कांसाठी असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले. आंदोलन शांततामय, अहिंसक आणि घटनात्मक मार्गाने करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.
नांदेड जिल्ह्यातील विद्यार्थी, युवक, महिला, कर्मचारी, शेतकरी आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
कोळी महादेव समाजाचा मोठा सहभाग
या उपक्रमात रातोळी, गडगा, मांजरमवाडी, होटाळा, नरसी, नायगाव, घुंगराळा, बेटक बिलोली आणि बरबडा आदी भागांतील कोळी महादेव समाजाचे नागरिक तसेच महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी नागनाथ घिसेवाड, परमेश्वर गोणारे, व्यंकट मुदिराज, आनंदा रेजितवाड, के. एन. जेठेवाड, बालाजी मदेवाड, शाम कोळी (धाराशिव), विश्वनाथ चंदलवाड, बाबू जेठेवाड, शंकर कोम्पलवड, देवराव भंडरवाड, नारायण बोईनवाड, प्रल्हाद जेठेवाड, प्रल्हाद मदेवाड, हणमंत बोईंनवाड, देविदास तमनबोईंनवाड, बालाजी उलगुलवाड, रमेश जेटेवाड, राजू मदेवा, दत्ता रेडेवाड, माधव रेडेवाड, शंकर रोडेवाड (सरपंच, बेटक बिलोली), मारोती पिटलेवाड, राम बांचेवाड, विजय भूसेवाड, राजू गादगे, मारोती बिचेवाड, शिवाजी चिंचे, त्र्यंबक मदेवाड आदींची उपस्थिती होती.
आयोजक : आदिवासी कोळी महादेव समाज, नांदेड जिल्हा



