नांदेड जिल्ह्यात वाळू माफियांविरुद्ध पोलिसांची मोठी कारवाई; १३ कोटींचा मुद्देमाल जप्त!
गोदावरी नदीपात्रात पोलिसांचे धडक कॉम्बिंग ऑपरेशन; २७ मोठ्या बोटींसह १३ छोट्या बोटी, १०८ तराफे आणि ५५५ ब्रास रेतीवर कारवाई

नांदेड | प्रतिनिधी – नांदेड जिल्ह्यातील गोदावरी नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशाविरोधात जिल्हा पोलीस आणि प्रशासनाने मोठी धडक कारवाई केली आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार संपूर्ण जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात आली. या कारवाईत तब्बल १३ कोटी १२ लाख १ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त व नष्ट करण्यात आला आहे.

मुदखेड, उस्माननगर, नांदेड ग्रामीण, नायगाव, लिंबगाव आणि धर्माबाद या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एकाच वेळी छापे टाकण्यात आले. या मोहिमेत ३० पोलीस अधिकारी, १२१ पोलीस अंमलदार, ७० होमगार्ड आणि दोन आरसीपी प्लाटून सहभागी झाले होते.
या धडक कारवाईत गोदावरी नदीपात्रातील अवैध वाळू उपसा केंद्रांवर तसेच वाळूची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या मोहिमेत २७ मोठ्या बोटी, १३ छोट्या बोटी, ५ इंजिने, १०८ तराफे, ४ हायवा ट्रक, १ टेम्पो, १ ट्रॅक्टर, १ पोकलेन आणि ५५५ ब्रास रेती असा मोठा मुद्देमाल कारवाईच्या कक्षेत आला.
मुदखेड पोलीस ठाण्याच्या पथकाने गोदावरी नदीपात्रात कारवाई करत १८ बोटी आणि रेती जप्त केली. उस्माननगर पोलिसांनी कोडगाव, कामळज आणि येळी परिसरात १४ बोटींसह पोकलेन व रेतीवर कारवाई केली. नांदेड ग्रामीण पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने मार्कंड, विष्णुपुरी, पिंपळगाव निमजी, वाहेगाव, कल्लाळ आणि भनगी परिसरात छापे टाकून बोटी, तराफे आणि रेती जप्त केली.
दरम्यान, नांदेड ग्रामीण आणि नायगाव पोलिसांनी रस्त्यांवर नाकाबंदी करून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या हायवा ट्रक आणि टेम्पोवर कारवाई केली. धर्माबाद येथेही ट्रॅक्टर-ट्रॉलीसह रेती जप्त करण्यात आली. लिंबगाव परिसरात अवैध वाळू उपशासाठी वापरण्यात येणारी इंजिने, लोखंडी बोट आणि तराफे आढळून आले. जप्त केलेली अवजड यंत्रसामग्री बाहेर काढणे शक्य नसल्याने काही साहित्य पंचांच्या उपस्थितीत स्फोट घडवून नष्ट करण्यात आले, तर तराफे जाळून नष्ट करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या प्रकरणांमध्ये संबंधित चालक, वाहनमालक आणि कथित वाळू उपशाशी संबंधित व्यक्तींविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि महाराष्ट्र जमीन महसूल संहितेनुसार गुन्हे दाखल करण्याची कारवाई करण्यात आली आहे. काही प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले.
गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करून पर्यावरणाची हानी करणाऱ्या आणि शासनाचा महसूल बुडवणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा नांदेड पोलिसांनी दिला आहे.
एकूणच, गोदावरी नदीपात्रातील वाळू माफियांविरुद्ध नांदेड पोलिसांनी केलेल्या या मोठ्या कारवाईमुळे अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीच्या साखळीला मोठा धक्का बसल्याचे चित्र आहे.



