जिला

रिकामे ताट, वाटी, तांब्या वाजवत ज्येष्ठांचा शासनाला इशारा; प्रश्न विधानसभेत, लोकसभेत मांडण्याचे लोकप्रतिनिधींचे आश्वासन – डॉ. हंसराज वैद्य

 

नांदेड : प्रतिनिधी – ज्येष्ठ नागरिकांच्या वाढत्या हालअपेष्टा, अपुरी आर्थिक मदत आणि शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, या मागणीसाठी उत्तर मराठवाडा प्रादेशिक विभाग फेस्कॉम नांदेड अध्यक्ष डॉ. हंसराज वैद्य यांच्या नेतृत्वाखाली जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनी नांदेडमध्ये जागतिक पातळीवर आगळीवेगळी ‘लक्षवेधी रिकामे ताट, वाटी, तांब्या पदयात्रा’ काढण्यात आली.

रिकामे ताट, वाटी आणि तांब्या वाजवत ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या जगण्यातील वेदना, उपेक्षा आणि प्रश्न शासनाच्या निदर्शनास आणून दिले.

मराठवाड्यात दुष्काळाची तीव्रता वाढत असताना त्याचा सर्वाधिक परिणाम शहरातील झोपडपट्टी व ग्रामीण भागातील सामान्य कुटुंबांवर होत आहे. विस्थापित, आदिवासी, निराधार निराश्रित, गरीब गरजवंत, दुर्लक्षित, उपेक्षित, वंचित शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कामगार, विधवा व परित्यक्ता माता तसेच दिव्यांग सामान्य नागरिकाबरोबरच ज्येष्ठ नागरिकांनाही या परिस्थितीचा मोठा फटका बसत आहे. उत्पन्नाचे साधन नसणे, वाढती महागाई, औषधोपचाराचा खर्च, निवासाचा प्रश्न आणि सामाजिक सुरक्षिततेचा अभाव यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांचे जीवन अत्यंत हलाखीचे झाले आहे.

शासनाने ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी विविध कायदे, नियम आणि धोरणे आखली आहेत. मात्र, त्यांची तळागाळात प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने ज्येष्ठ नागरिकांना आपल्या हक्कांसाठी संघर्ष करावा लागत आहे. ज्येष्ठांना सन्मानाने आणि सुरक्षितपणे जगता यावे, यासाठी शासनाने केवळ योजना जाहीर न करता त्यांची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी डॉ. वैद्य यांनी केली.

या पदयात्रेच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यातील विविध लोकप्रतिनिधींशी संपर्क साधून ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांबाबत निवेदने देण्यात आली. आमदार बोंढारकर, आमदार कल्याणकर, राजूभाऊ नवघरे, बाबुराव कदम कोहळीकर, संतोष बांगर, सतीश चव्हाण आदी लोकप्रतिनिधींनी ज्येष्ठांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक भूमिका घेतली. आगामी विधानसभा अधिवेशनात तसेच शासनस्तरावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि संबंधित मंत्र्यांसमोर हे प्रश्न ठामपणे मांडून त्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिल्याचे डॉ. वैद्य यांनी सांगितले.

दरम्यान, खासदार रवींद्र वसंतराव चव्हाण यांनी आपल्या प्रतिनिधीमार्फत पत्र पाठवून पदयात्रेला पाठिंबा दर्शविला. ग्रामीण भागाशी आपली नाळ जोडलेली असून ज्येष्ठ नागरिकांच्या परिस्थितीची आपल्याला पूर्ण जाणीव आहे. त्यामुळे त्यांच्या मागण्या लोकसभेत प्रभावीपणे मांडून केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिल्याचे डॉ. वैद्य यांनी सांगितले.

लाडके मायबाप योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना नियमित आणि पुरेशी आर्थिक मदत, आरोग्य सुविधा, औषधोपचारात सवलत, सुरक्षित निवास, शासनाच्या योजनांचा सुलभ लाभ आणि त्यांच्या हक्कांचे संरक्षण मिळावे, यासाठी ठोस धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली. तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यासाठी प्रशासनाच्या प्रत्येक स्तरावर सक्षम यंत्रणा उभारावी, अशीही मागणी करण्यात आली.

“रिकामे ताट, वाटी आणि तांब्या हे केवळ 3आंदोलनाचे प्रतीक नाही, तर ज्येष्ठ नागरिकांच्या जगण्यातील वेदना, उपेक्षा आणि शासनाच्या दरवाजापर्यंत पोहोचवलेला त्यांच्या हक्कांचा आवाज आहे.

या गरीब गरजवंत ज्येष्ठ नागरिकांमध्ये आपल्या आई-वडिलांना पाहून लोकप्रतिनिधींनी दिलेली आश्वासने प्रत्यक्ष कृतीत उतरली, तरच या पदयात्रेचे खरे यश ठरेल,” असे डॉ. हंसराज वैद्य यांनी स्पष्ट केले.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *