नांदेड पोलीस दलाची तक्रार निवारण मोहिम यशस्वी – एकूण २३७ तक्रारींचा निपटारा

नांदेड, ५ एप्रिल २०२५: नांदेड पोलीस दलाच्या वतीने तक्रार निवारण दिनाचे औचित्य साधून एकूण २३७ तक्रारींचा यशस्वी निपटारा करण्यात आला आहे. यामध्ये स्थानिक स्तरावरील २५ आणि वरिष्ठ स्तरावरील २१२ तक्रारींचा समावेश आहे.
मा. श्री. अभिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक शनिवारी सर्व पोलीस स्टेशनमध्ये तक्रार निवारण दिन साजरा करण्याच्या सूचना दिल्या होत्या. नांदेड जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये प्रलंबित अर्जांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर, वेळेत नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा करण्याचे आदेश देण्यात आले होते.
त्याअनुषंगाने दिनांक ५ एप्रिल २०२५ रोजी संपूर्ण जिल्ह्यात एकाचवेळी तक्रार निवारण मोहिम राबवण्यात आली. नागरिकांनी आपल्या विविध समस्या मांडल्यावर संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी तत्काळ कारवाई करत अनेक तक्रारींचे निवारण केले.
मा. श्री. अभिनाश कुमार यांनी पुढे सांगितले की, दर शनिवारी अशीच मोहिम राबवण्यात येणार असून, नागरिकांनी आपल्या तक्रारी संबंधित पोलीस स्टेशनमध्ये उपस्थित राहून निवारित करून घ्याव्यात, असे आवाहन त्यांनी केले आहे.
ही यशस्वी मोहिम उपविभागीय पोलीस अधिकारी, नांदेड तसेच शहरातील सर्व पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांच्या एकत्रित प्रयत्नातून पार पडली. पोलीस अधीक्षकांनी या उल्लेखनीय कार्याचे कौतुक करत सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.



