डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय इतिहासातील एक अत्युच्च व्यक्तिमत्व होते. त्यांनी संविधानकार, कायदेतज्ज्ञ, समाजसुधारक, अर्थतज्ज्ञ आणि विचारवंत म्हणून केलेल्या कार्याने देशाच्या वाटचालीला दिशा दिली. परंतु त्यांचे एक महत्त्वाचे, आणि क्वचित चर्चेत येणारे योगदान म्हणजे त्यांच्या पत्रकारितेचे कार्य.
बाबासाहेबांना सामाजिक परिवर्तनासाठी फक्त राजकीय व शैक्षणिक मार्ग पुरेसा वाटत नव्हता. विचारांची क्रांती घडवण्यासाठी व बहुजन समाजात आत्मभान निर्माण करण्यासाठी त्यांनी पत्रकारितेचा मार्ग स्वीकारला.
ते म्हणायचे, मला समाजात परिवर्तन घडवायचं आहे, तर मला समाजाला जागं करावं लागेल, आणि त्यासाठी लेखणीचा वापर करावा लागेल. बाबासाहेबांनी अनेक नियतकालिके सुरू केली व चालवली. मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता, आणि प्रबुद्ध भारत या नियतकालिकांद्वारे त्यांनी आपल्या विचारांची पेरणी केली. त्यांच्या लिखाणात स्पष्टता, निर्भीडपणा आणि सामाजिक न्यायाची तीव्र तळमळ होती. त्यांनी दलित समाजाच्या वेदना, अन्याय व बहिष्कृततेचे जिवंत चित्र आपल्या लेखणीतून उभे केले. त्यांचे शब्द हे केवळ मते मांडणारे नव्हते, तर एक क्रांती घडवणारे होते.
डॉ बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता केवळ परिस्थितीवर भाष्य करणारी नव्हती, तर ती परिस्थिती बदलण्यासाठी जनतेला सजग करणारी होती. त्यांनी लेखणीचा उपयोग केवळ टीका करण्यासाठी केला नाही, तर एक नवीन विचारप्रवाह घडवण्यासाठी केला. त्यांच्या लेखनातून अस्पृश्य समाजाला नवजीवन मिळाले. स्वाभिमान, आत्मसन्मान आणि समतेचा संदेश या पत्रकारितेच्या माध्यमातून बाबासाहेबांनी दिला. बाबासाहेबांची पत्रकारिता ही विद्रोहाची होती, पण तो विद्रोह वैचारिक होता. न्यायासाठी, हक्कांसाठी व मानवतेसाठी लढणारा. त्यांनी रूढी, अंधश्रद्धा व अन्यायकारक सामाजिक रचना यांचा कठोर शब्दांत निषेध केला. त्यांच्या लिखाणातून सामाजिक जागृती, बौद्धिक क्रांती आणि आत्मभानाचा झरा वाहत राहिला.
आज जेव्हा आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल बोलतो, पत्रकारितेतील नीतिमत्ता शोधतो, तेव्हा बाबासाहेबांचे लिखाण आपल्याला प्रेरणा देते. त्यांच्या लेखणीत सत्याची धार होती व सामाजिक परिवर्तनाची ताकद होती. ही पत्रकारिता आजही प्रासंगिक आहे, कारण ती केवळ वर्तमानावर भाष्य करत नव्हती, तर भविष्य घडवत होती.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता म्हणजे विचारांची मशाल होती. त्या मशालीच्या प्रकाशात आजही असंख्यांचे जीवन उजळत आहे. त्यांची पत्रकारिता ही समाज परिवर्तनाची शिस्तबद्ध आणि तत्त्वनिष्ठ चळवळ होती जी आजही आपल्याला दिशा दाखवते, प्रेरणा देते व सत्यासाठी लढण्याची ताकद देते.
मिलिंद व्यवहारे, नांदेड
8626025825



