सायबर पोलीस स्टेशन नांदेडची धडाकेबाज कामगिरी: ऑनलाईन फसवणूक झालेल्या ४ नागरिकांना परत मिळाले तब्बल 4.86 लाख

नांदेड, ८ मे २०२५: सायबर पोलीस स्टेशन नांदेड यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे आणि प्रभावी कार्यवाहीमुळे तब्बल चार ऑनलाईन फसवणूकग्रस्त तक्रारदारांना एकूण ₹4,86,098.74/- इतकी रक्कम परत मिळाली आहे. संबंधित तक्रारींवर त्वरीत कारवाई करून, संबंधित बँक खात्यांमध्ये पैसे होल्ड करण्यात आले होते. न्यायालयाच्या आदेशानुसार ही रक्कम तक्रारदारांना परत करण्यात आली आहे.
चार प्रमुख प्रकरणे: ED अधिकाऱ्यांच्या नावाखाली फसवणूक (₹3.57 लाख परत) – भाग्यनगर: तक्रारदाराला संशयिताने स्वत:ला ईडी अधिकारी सांगून “डिजिटल अटक” व बँक खाते जप्तीची भीती दाखवून ₹11,12,000/- उकळले. तत्काळ कारवाई करून ₹3,57,505.74/- होल्ड करून न्यायालयाच्या आदेशाने परत करण्यात आले.
फेक कस्टमर केअर लिंकद्वारे फसवणूक (₹71,798 परत) – नांदेड ग्रामीण:
ऑनलाईन चप्पल परत करताना गूगलवर कस्टमर केअर नंबर शोधून फेक लिंकद्वारे स्क्रीन शेअर करून फसवणूक झाली. संपूर्ण रक्कम न्यायालयाच्या आदेशाने परत मिळाली.
चुकून चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर (₹16,700 परत) – शिवाजीनगर:
चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झाल्यावर तक्रार दाखल केल्यानंतर तात्काळ कारवाई करून संपूर्ण रक्कम परत मिळवली.
गिफ्ट रेफ्रिजरेटरच्या नावाखाली फसवणूक (₹40,095 परत) – वजीराबाद:
गिफ्ट लागल्याचे सांगून वेगवेगळ्या कारणांनी पैसे उकळण्यात आले होते. सायबर पोलीसांच्या तत्परतेने सर्व रक्कम होल्ड होऊन परत मिळाली.
कार्यवाही करणारे अधिकारी: ही कार्यवाही पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव आणि खंडेराय धरणे, तसेच पो.नि धीरज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि चव्हाण, पो.कॉ काशिनाथ कारखेडे आणि दीपक राठोड यांनी पार पाडली.
अधिकार्यांचे अभिनंदन: पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांनी या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे व पोलीस अंमलदारांचे अभिनंदन केले.
महत्वाचे आवाहन: “जर आपल्या सोबत ऑनलाईन फसवणूक झाली असेल तर तात्काळ 1930 या हेल्पलाईनवर कॉल करा किंवा cybercrime.gov.in या पोर्टलवर तक्रार नोंदवा. वेळेत तक्रार केल्यास तुमचे पैसे परत मिळवणे शक्य होऊ शकते.” – पोलीस अधीक्षक, नांदेड



