पंतप्रधान आवास योजना टप्पा-२ अंतर्गत ग्रामीण व शहरी भागात सुरू असलेले सर्वेक्षण काटेकोरपणे करण्यात यावे;
जेणेकरून कोणताही गरजू नागरिक या योजनेपासून वंचित राहणार नाही, असे निर्देश माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

पंतप्रधान आवास योजनेच्या सर्वेक्षणाचा आढावा घेण्यासाठी आ. श्रीजया चव्हाण यांनी मंगळवारी सकाळी आयोजित केलेल्या ऑनलाईन बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले, भोकर विधानसभा मतदारसंघातील तीनही तालुक्यांचे गटविकास अधिकारी, भोकर, अर्धापूर व मुदखेड नगर परिषद, नगर पंचायतचे मुख्याधिकारी तसेच भाजपचे नांदेड महानगराध्यक्ष व माजी आमदार अमरनाथ राजूरकर, नांदेड ग्रामीण उत्तरचे जिल्हाध्यक्ष अॅड. किशोर देशमुख, किशोर स्वामी, तीनही तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे सर्व मंडळ अध्यक्ष दिवाकर रेड्डी, विशाल माने, बालाजी गव्हाणे, योगेश हाळदे, दत्तू देशमुख वाडीकर, रामसिंग चव्हाण आदी उपस्थित होते.
बैठकीच्या प्रारंभी पंतप्रधान आवास योजनेच्या या सर्वेक्षणाचा तालुकानिहाय आढावा घेण्यात आला. त्यानंतर बैठकीला संबोधित करताना खा. अशोकराव चव्हाण यांनी सर्वेक्षणामध्ये अधिक गती आणण्याची सूचना केली. पंतप्रधान आवास योजना ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांक्षी योजना असून, या योजनेच्या माध्यमातून बेघरांना तसेच कच्च्या घरात राहणाऱ्या गरजू नागरिकांना पक्क्या घराची सुविधा उपलब्ध होते. त्यामुळे कोणताही गरजू व पात्र नागरिक या सर्वेक्षणातून वंचित राहता कामा नये. या योजनेकरिता अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ मे आहे. त्यामुळे पुढील तीन दिवसांत प्रशासनाने अधिक व्यापक स्तरावर जनजागृती व सर्वेक्षण करावे, असे निर्देशही खा. अशोकराव चव्हाण यांनी यावेळी दिले.
या बैठकीनंतर आ. श्रीजया चव्हाण यांनी सदर योजनेसाठी इच्छुकांनी तातडीने ग्रामपंचायत अधिकारी (ग्रामसेवक) किंवा नगरपरिषद व नगरपंचायतच्या मुख्याधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन समाजमाध्यमांवरून केले. त्याचप्रमाणे शासनाच्या या सर्वेक्षणात जास्तीत जास्त गरजू नागरिकांचा समावेश करण्याच्या दृष्टीकोनातून भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा व अधिक माहितीसाठी भाजपच्या मंडळ अध्यक्षांशी संपर्क साधावा, अशीही सूचना त्यांनी केली आहे.



