नांदेडमध्ये एकाच दिवशी पाच सराईत गुन्हेगारांवर MPDA अंतर्गत कठोर कारवाई; एक वर्षासाठी ‘स्थानबद्ध’

नांदेड – शहर व जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून नांदेड पोलिस प्रशासनाने मोठी कारवाई करत पाच सराईत गुन्हेगारांना “2+ स्कीम” अंतर्गत MPDA कायद्यान्वये एक वर्षासाठी स्थानबद्ध केले आहे. या गुन्हेगारांना छत्रपती संभाजीनगर येथील मध्यवर्ती कारागृहात दाखल करण्यात आले आहे.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये अपर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे, सुरज गुरव तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सुशिलकुमार नायक, स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. उदय खंडेराय, इतवारा, शिवाजीनगर, व नांदेड ग्रामीण पोलिस स्टेशनचे अधिकारी सहभागी होते.
स्थानबद्ध करण्यात आलेले आरोपी पुढीलप्रमाणे: अविनाश ऊर्फ लखन साहेबराव ढगे (रा. आंबेडकरनगर), अनिकेत बालाजी सुर्यवंशी (रा. दत्तनगर), गणेश भुजंगराव मोरे (रा. शाहूनगर, वाघाळा), मनप्रितसिंग ऊर्फ तेजा चरणसिंग टाक (रा. सिडको, नांदेड), सक्षम गौतम ताटे (रा. संघसेन नगर, इतवारा)
या आरोपींवर खून, खूनाचा प्रयत्न, जबरी चोरी, खंडणी वसुली, शस्त्र बाळगणे यांसारख्या गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. वारंवार कारवाई होऊनही या गुन्हेगारांमध्ये सुधारणा न झाल्याने ही कठोर उपाययोजना करण्यात आली आहे.
शिस्तप्रिय नागरिकांचा त्रास टाळण्यासाठी पोलिसांची पुढील रणनीती पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी 2024-25 मध्ये महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार आतापर्यंत 87 गुन्हेगारांना हद्दपार आणि 9 सराईत गुन्हेगारांना MPDA अंतर्गत स्थानबद्ध केल्याचे सांगितले. शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अशा गुन्हेगारांविरुद्ध कठोर पावले उचलली जात आहेत.
पोलीस विभागाचे यश या कारवाईत पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर, जालिंदर तांदळे, रणजीत भोईटे आणि पोलीस उपनिरीक्षक उमेश कदम यांचे मोलाचे योगदान राहिले. स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. उदय खंडेराय यांनी प्रस्तावातील माहिती सुस्पष्ट व पूरक ठेवून कामगिरीची जबाबदारी पार पाडली.
या कारवाईमुळे नांदेड शहरातील गुन्हेगारीवर मोठा आळा बसेल आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास निर्माण होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.



