नांदेड जिल्ह्यात घरकुल बांधणी; लाखो गोरगरीबांना मिळत आहे हक्काचं घर

नांदेड, २७- ग्रामीण भागातील गोरगरीब, वंचित आणि आदिवासी कुटुंबांना निवारा मिळवून देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी नांदेड जिल्ह्यात केली जात आहे. विशेषतः प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व तत्सम योजनांतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत ९३ हजार ७८६ घरकुले पूर्ण झाली असून हजारो लाभार्थ्यांचे हक्काच्या घराचे स्वप्न साकार झाले आहे. यामुळे नांदेड जिल्हा घरकुल निर्मितीमध्ये आघाडीवर असून, अनेक योजनांमधून लाभार्थ्यांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवले जात आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले यांनी दिली आहे.
सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत नांदेड जिल्ह्यासाठी १ लाख ५० हजार ७८५ घरकुलांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. यापैकी १ लाख ४५ हजार ६९८ लाभार्थ्यांना ऑनलाईन मंजुरी देण्यात आली आहे. १ लाख ३० हजार ५१ लाभार्थ्यांना पहिला हप्ता, तर ३० हजार ८ लाभार्थ्यांना दुसरा हप्ता वितरीत झाला आहे. यामध्ये २ हजार ५०९ घरकुले पूर्ण झाली असून १ लाख २८ हजार घरकुलांचे काम सुरू आहे.
सन २०२५-२६ मध्ये ९१ हजार ९०८ नवीन घरकुलांचे उद्दिष्ट प्राप्त झाले असून त्यापैकी ५३ हजार ३२७ लाभार्थ्यांना मंजुरी देण्यात आली आहे. उर्वरित लाभार्थ्यांच्या कागदपत्रांची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. अवास प्लस सर्वे २०२४ अंतर्गत शासनाने उपलब्ध करून दिलेल्या लिंकवरून २ लाख ३७ हजार ९३ नव्या लाभार्थ्यांचे रजिस्ट्रेशन करण्यात आले आहे.
याशिवाय, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा १ अंतर्गत ६० हजार ९२९ घरकुले पूर्ण झाली आहेत. तर ७ हजार ३७२ घरकुले प्रगतीपथावर आहेत. रमाई आवास योजना अंतर्गत २०१६-१७ ते २०२४-२५ या कालावधीत ३३ हजार ६०० घरकुलांचे उद्दिष्ट होते, त्यापैकी २६ हजार ४६७ लाभार्थ्यांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये १८ हजार २६८ घरकुले पूर्ण झाली असून उर्वरित कामे सुरू आहेत. शबरी आवास योजना अंतर्गत ७ हजार ९९१ घरकुलांचे उद्दिष्ट, ४ हजार ११२ मंजुरी, आणि १ हजार ७९५ पूर्ण घरकुलांची नोंद आहे. मोदी आवास योजना २०२३-२४ अंतर्गत २३ हजार ५७० चे उद्दिष्ट गाठले असून २३ हजार ५९६ लाभार्थ्यांना मंजुरी, आणि १० हजार १३५ पूर्ण झालेली घरकुले अशी स्थिती आहे.
दरम्यान, पी.एम. जनमन योजना ही आदिवासी भागातील विशेष योजना केवळ किनवट व माहूर तालुक्यांमध्ये राबवली जात आहे. त्याअंतर्गत १९३ लाभार्थ्यांना मंजुरी मिळाली असून १५० घरकुले पूर्ण तर ४३ घरकुले प्रगतीपथावर आहेत.



