लोहा (जि. नांदेड) – सायाळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या परिसरात साचलेल्या घाण पाण्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात!

लोहा तालुक्यातील सायाळ येथील जि.प.प्रा.शाळेच्या प्रांगणात गावातील नालीचे सांडपाणी थेट शाळेच्या आवारात जमा होत असल्याने विद्यार्थ्यांचे दैनंदिन शिक्षण व आरोग्य धोक्यात आले आहे.
गावातील नाली व्यवस्थेतील त्रुटींमुळे सांडपाण्याचा प्रवाह थेट शाळेच्या अंगणात वळवला गेला असून, त्यामुळे शाळेच्या मैदानावर प्रार्थना, परिपाठ, शारीरिक शिक्षण आदी उपक्रम घेणे अशक्य झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दररोज घाण पाण्याच्या दुर्गंधीतून शिकावे लागत आहे.
शाळा व्यवस्थापन समिती व पालकांनी याबाबत ग्रामपंचायत व संबंधित अधिकाऱ्यांकडे अनेकदा तक्रारी केल्या असल्या तरी अद्याप ठोस उपाययोजना झालेली नाही.
या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर तसेच आरोग्यावरही प्रतिकूल परिणाम होत असून त्वचारोग, विषाणूजन्य आजार पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
स्थानिक प्रशासनाने तातडीने लक्ष घालून नालीचे पाणी शाळेपासून दूर वळवण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. छायाचित्र : विनोद महाबळे



