काँग्रेस पक्षाच्या वतीने लोहा नगरपरिषद प्रशासनाच्या विरोधात जोरदार मोर्चा
लोहा | प्रतिनिधी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने लोहा नगरपरिषद प्रशासनाच्या विरोधात जोरदार मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाच्या माध्यमातून नागरिकांच्या विविध समस्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.
या मोर्चाचे नेतृत्व लोहा-कंधार काँग्रेस प्रभारी अनिलजी मोरे, कंधार तालुकाध्यक्ष संजय भोसीकर, माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीनिवास मोरे, लोहा तालुकाध्यक्ष मधुकर पाटील दिघे, शहराध्यक्ष सोनुभाऊ संगेवार, माजी शहराध्यक्ष वसंत पवार, तालुका कोषाध्यक्ष शिवाजी आंबेकर, माजी नगरसेवक उत्तम महाबळे, चंद्रकांत पाटील नळगे, बाबासाहेब बाबर, मेकाले आदींनी केले.
मोर्चात नागरिकांनी नगरपरिषदेकडून मूलभूत सुविधांच्या अभावाबाबत जोरदार आवाज उठवला. शहरातील रस्ते, नाल्यांची दुरवस्था, पाणीपुरवठा आणि स्वच्छतेबाबत प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत त्वरित उपाययोजना करण्याची मागणी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केली.
या मोर्चाला मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती लाभली होती, ज्यामुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली.
छायाचित्र: विनोद महाबळे



