रावसाहेब विठ्ठलराव यरडे पाटील यांना राज्यस्तरीय प्रेरणादीप पुरस्कार जाहीर.

बिलोली:- (प्रतिनिधी) समाजासाठी न बोलता काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यासाठी दिला जाणारा “प्रेरणादीप पुरस्कार २०२५” यावर्षी नांदेड जिल्हा बिलोली तालुक्यातील जिगळा गावचे माजी सरपंच रावसाहेब विठ्ठलराव यरडे पाटील यांना जाहीर झाला आहे.
सामाजिक, ग्रामविकास व मूल्याधारित कार्यासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे.
जिगळा हे बिलोली तालुक्यातील एक छोटं गाव. रावसाहेब पाटील यांनी या गावात हागणदारीमुक्ती, झोपडपट्टी निर्मूलन, व्यसनमुक्ती यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर गांभीर्याने काम केलं आहे. त्यांनी गावातील अनेकांना स्वतःच्या खर्चातून व्यसनमुक्त केलं आणि त्यांना कीर्तन, भजन यासारख्या अध्यात्मिक मार्गाकडे वळवलं.
गावात कीर्तनकारांना बोलवून समाजात सद्विचार रुजवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. शेती सुधारण्यासाठी गाळयुक्त जलसंधारण पद्धतीचा अवलंब केला. गावातील राजकीय व सामाजिक मतभेद मिटवून “मित्रत्व व एकता” याची शिकवण दिली.
या कार्याची दखल घेत मातोश्री लक्ष्मीबाई ठाकुर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व मायडी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था नांदेड यांच्या वतीने पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. संस्थापक अध्यक्ष श्री. शंकर सिंह ठाकुर व मारोती बा. शिकारे यांनी जिगळा येथे भेट देऊन पुरस्कार निवडीचे पत्र स्वतः त्यांच्याकडे सुपूर्त केलं.
या वेळी गावातील प्रकाश पाटील कानोले, चांद शेख, नरसिंग पाटील कानोले, न्यानू पाटील कानोले यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
प्रेरणादीप पुरस्काराचे वितरण २८ सप्टेंबर २०२५ रोजी, हॉटेल ताज पाटील, नांदेड येथे होणार आहे.
ते गाजत नाहीत… पण माणसं जोडतात!
ते झगमगत नाहीत… पण अंधार दूर करतात!
असाच एक ‘प्रकाशदीप’ — रावसाहेब यरडे पाटील!



