मुसळधार पावसाने नांदेडसह मराठवाड्यात उध्द्वस्त चित्र
नायगाव मतदारसंघातील शेतकऱ्यांची दयनीय स्थिती; तातडीने ‘ओला दुष्काळ’ जाहीर करण्याची मागणी


नांदेड (प्रतिनिधी): गेल्या महिन्याभरापासून नांदेड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात पावसाने अक्षरशः महारुद्र रूप धारण केले आहे. या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. शेतातील पिके पाण्याखाली गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
शेतकऱ्यांची झालेली बेहाल अवस्था
नायगाव विधानसभा मतदारसंघातील आटाळा, येल्लापूर, कावलगुडा, कारेगाव, चोंडी, दिग्रस, पिंपळगाव, रोशनगाव, बाभळी, शेळगाव, रत्नाळी आदी गावांमध्ये शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतजमिनी पाण्याखाली गेल्या असून खरीप हंगामाचे पीक पूर्णपणे नष्ट झाले आहे. काही शेतकऱ्यांची जनावरे, गोठे आणि घरांना देखील मोठा फटका बसला आहे.
प्रत्यक्ष पाहणी व मागणी
पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांची झालेली बिकट परिस्थिती प्रत्यक्ष पाहण्यात आली. या वेळी उपस्थित शेतकऱ्यांनी सरकारला झोपेचे सोंग न घेता तातडीने ‘ओला दुष्काळ’ जाहीर करण्याची मागणी केली. शेतकऱ्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी तातडीने मदतकार्य सुरू व्हावे, अन्यथा उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील देण्यात आला.
पूरग्रस्त शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित
या पाहणीदरम्यान मोठ्या संख्येने पूरग्रस्त शेतकरी उपस्थित होते. आपल्या हालअपेष्टा सांगताना अनेकांच्या डोळ्यात अश्रू होते. “कष्टाचे पीक पाण्यात गेले, आता संसार कसा चालवायचा?” अशी आर्त हाक शेतकऱ्यांनी दिली.



