एसटी आरक्षणासाठी बंजारा समाजाचा विराट एल्गार मोर्चा
हजारो महिलांचा पारंपरिक वेशभूषेत उत्स्फूर्त सहभाग; जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

नांदेड (प्रतिनिधी): “हैदराबाद गॅझेटिअरनुसार बंजारा समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातून आरक्षण द्यावे” या ठाम मागणीसाठी बंजारा समाजाने नांदेडमध्ये विराट एल्गार मोर्चा काढला. २९ सप्टेंबर रोजी काढलेल्या या मोर्चात मराठवाड्यासह विदर्भ, तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक राज्यांतील हजारो बांधवांनी सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे, या मोर्चाचे वैशिष्ट्य ठरले ते म्हणजे पारंपरिक वेशभूषेत मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या महिला.
मोर्चाची प्रभावी सुरुवात
सकाळी ११ वाजता मार्केट कमिटी, नवा मोंढा मैदान येथून मोर्चाला प्रारंभ झाला. अण्णाभाऊ साठे चौक, हिंगोली गेट उड्डाणपूल, चिखलवाडी कॉर्नर, महात्मा गांधी पुतळा या प्रमुख मार्गाने निघालेला मोर्चा दुपारपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या दरम्यान हजारो चारचाकी वाहने, दुचाकी, शेकडो ट्रॅक्टर, ट्रक, आयशर आदी वाहनांच्या ताफ्यासह मोर्चेकऱ्यांनी शहरात प्रवेश केला.
सांस्कृतिक उत्साहाचा संगम
मोर्चामध्ये ५०० हून अधिक डफडे, वाजंत्री, अश्व, रथ, भजनी मंडळींच्या गजरात सहभागी झालेले युवक-युवती हे आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले. युवती आघाडी आणि वंजारा स्टुडंट असोसिएशनच्या कार्यकर्त्यांनी मोर्चाची धुरा सांभाळून नेतृत्व केले. समाजबांधवांनी आरक्षणाच्या मागणीसाठी दिलेल्या गगनभेदी घोषणा संपूर्ण शहरात घुमल्या.
सभेत नेत्यांचे मार्गदर्शन
जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचताच मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. या वेळी आमदार डॉ. तुपार राठोड, मोर्चाचे संयोजक डॉ. वी. डी. चव्हाण यांच्यासह प्रमुख नेत्यांनी मार्गदर्शन केले. समाजाने दशकांपासून होत असलेल्या अन्यायावर आवाज उठवला पाहिजे, असा संदेश नेत्यांनी दिला.
ठाम मागणी
हैदराबाद गॅझेटिअरचा दाखला देत बंजारा समाजाला तातडीने अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातून आरक्षण द्यावे, अशी ठाम मागणी सभेतून करण्यात आली. “न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरू राहील,” असा इशारा यावेळी देण्यात आला.



