बलात्कार व पोक्सो गुन्ह्यातील फरार आरोपींना भाग्यनगर गुन्हे शोध पथकाची अटक


नांदेड | बलात्कार आणि पोक्सोसारख्या गंभीर गुन्ह्यात मागील तीन वर्षांपासून फरार असलेल्या दोघा आरोपींना भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने बुधवारी अटक केली. या कारवाईबाबत पोलीस अधीक्षक मा. श्री. अविनाश कुमार यांनी कारवाई करणाऱ्या पथकाचे अभिनंदन केले आहे.
अटक केलेले आरोपी : 1. आकाश साहेबराव सुर्यवंशी, वय 26 वर्षे, व्यवसाय – मजुरी, रा. दाभड, मारोती मंदिराजवळ, ता. अर्धापूर, जि. नांदेड, 2. राजेश उर्फ राजु देवराव बगाटे, वय 25 वर्षे, व्यवसाय – मजुरी, रा. कल्याणनगर, सम्राट अशोक चौक, तरोडा (बु), नांदेड
पोलीस अधीक्षकांनी सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकाऱ्यांना फरार आरोपींना अटक करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार 29 नोव्हेंबर 2025 रोजी भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उपनिरीक्षक विनोद देशमुख, नरेश वाडेवाले आणि त्यांच्या पथकाने पेट्रोलिंग करत असताना, गुप्त माहितीदारामार्फत आरोपी क्रमांक 01 हा दाभड गावात असल्याची माहिती मिळाली.

त्यावर तात्काळ कारवाई करत पथकाने दाभड येथे जाऊन आकाश सुर्यवंशी यास ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने दुसरा आरोपी राजेश बगाटे याचा पत्ता कल्याणनगर असल्याचे सांगितले. त्यानंतर पथकाने कल्याणनगर येथील कॅनॉल रोड परिसरात सापळा रचून आरोपी राजेश बगाटे यासही ताब्यात घेतले.
दोन्ही आरोपींना पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानुसार दोघांना संबंधित गंभीर गुन्ह्यात अटक करण्यात आली असून, अधिक तपास पो.उप.नि. विनोद देशमुख हे करीत आहेत.



