जिला

जिल्हा परिषदेचे ज्येष्ठ वाहनचालक अमजद खान सेवानिवृत्त; सपत्नीक सत्कार

अमजद खान कर्तव्यनिष्ठेचा आदर्श- मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली

 

नांदेड,2- मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे वाहनचालक म्हणून काम करणे अत्यंत जबाबदारीचे असते आणि अमजद खान यांनी ही जबाबदारी अतिशय निष्ठा, संयम आणि शिस्तीने पार पाडली, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली यांनी केले.

मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या उपस्थितीत सोमवार दिनांक 1 डिसेंबर रोजी कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात जिल्हा परिषदेच्या वतीने ज्येष्ठ वाहनचालक अमजद खान वाहिद खान यांच्या सेवानिवृत्ती निमित्त आयोजित सत्कार सोहळा संपन्न झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डी.बी. गिरी, नरेगा उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमित राठोड, मुख्य लेखा व वित्त अधिकारी शिवप्रसाद चन्ना, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात, अभियंता राहुल रावसाहेब, अशोक भोजराज, शिंदे, शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे आदींची उपस्थिती होती.

पुढे त्या म्हणाल्या, अमजद खान यांनी शांत व तक्रारविरहितपणे तसेच वेळेचे काटेकोर पालन करत काम केले. कुठेही, कधीही जाण्याची वेळ आली तरी ते तत्परतेने उपलब्ध असत. त्यांची शिस्त, संवादकौशल्य व सेवाभाव नेहमीच स्मरणात राहील, असेही त्या म्हणाल्या. यावेळी त्यांनी त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा ही दिल्या.

कार्यक्रमात अमजद खान यांना कार्यमुक्ती आदेश, पेन्शन आदेश आणि सेवा प्रमाणपत्र मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या वतीने शाल, साडी–ड्रेस, पुष्पहार देऊन त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.

यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांनी प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी असताना अमजद खान यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. वाहनचालक संघटनेचे गणेश आंबेकर, माणिक बाशिंगे व संजय राऊत यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन जनसंपर्क अधिकारी मिलिंद व्यवहारे यांनी केले. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

1983 साली हेल्पर म्हणून सेवेत रुजू झालेले अमजद खान यांची 1988 मध्ये मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे वाहनचालक म्हणून नियुक्ती झाली. तब्बल साठहून अधिक मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत काम करण्याचा मान त्यांना लाभला. शांत स्वभाव, वक्तशीरपणा, शिस्तप्रियता, जबाबदारीची जाण, समन्वय साधण्याची कला आणि कर्तव्यनिष्ठा या गुणांमुळे त्यांची जिल्हा परिषदेत विशेष ओळख निर्माण झाली.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *