क्राईम

लिफ्ट मागितलेल्या व्यक्तीचा कारमध्ये जाळून खून; एका महिलेला पाठवलेल्या मेसेजमुळे कट उघड

 

राज्यात गुन्हेगारी घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असतानाच लातूर जिल्ह्यातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विम्याच्या पैशांसाठी स्वतःचा मृत्यू दाखवण्याचा बनाव करत एका निरपराध व्यक्तीचा खून केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.

जळालेल्या कारमधील मृतदेहाने उघड झाली रहस्यमय कहाणी
13 डिसेंबर 2025 रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास औसा तालुक्यातील वानवडा रोडवर एक कार जळालेल्या अवस्थेत आढळून आली. कारमध्ये एका व्यक्तीचा जळून मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं. सुरुवातीला अपघात किंवा आत्महत्येचा संशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र, पोलिस तपासात या घटनेमागे थंड डोक्याने आखलेला खून असल्याचं समोर आलं.

विम्याच्या रकमेकरिता आखलेला मृत्यूचा बनाव
या प्रकरणातील मुख्य आरोपी गणेश गोपीनाथ चव्हाण (रा. विठ्ठल नगर, औसा) हा मयत बळीराम राठोड यांचा मेहुणा असून तो त्यांची कार (MH 43 AB 4200) वापरत होता. गणेश आर्थिक अडचणीत सापडला होता. त्याच्यावर सुमारे 57 लाख रुपयांचे कर्ज होते, तर तो गेल्या तीन वर्षांपासून एक कोटी रुपयांचा टर्म इन्शुरन्सधारक होता. कर्जातून मुक्त होण्यासाठी आणि कुटुंबाला विम्याची रक्कम मिळावी यासाठी त्याने स्वतःचा मृत्यू दाखवण्याचा कट रचला.

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने हत्या
13 डिसेंबर रोजी रात्री सुमारे 10 वाजता घरातून निघालेल्या गणेशने याकतपूर–नपूर रोड चौकात गोविंद किशन यादव (वय 50, रा. पाटील गल्ली, औसा) यांना लिफ्ट दिली. दारूच्या नशेत असलेल्या गोविंदला ड्रायव्हर सीटवर बसवून सीट बेल्ट लावण्यात आला. त्यानंतर कारमध्ये मॅचिसच्या काड्या आणि प्लास्टिक पिशव्या टाकून आग लावण्यात आली. पेट्रोल टाकीचं झाकण उघडं ठेवून गणेश घटनास्थळावरून पसार झाला.

एका मेसेजमुळे पोलिसांना मिळाला धागा
घटनेनंतर गणेश सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग येथे लपून बसला होता. मात्र, तो एका महिलेशी सातत्याने संपर्कात असल्याचं तपासात निष्पन्न झालं. वेगळ्या मोबाईल नंबरवरून पाठवलेल्या मेसेजमुळे पोलिसांना त्याचं लोकेशन मिळालं आणि संयुक्त पथकाने त्याला सिंधुदुर्ग येथून अटक केली. संबंधित महिलेला ताब्यात घेऊन चौकशी सुरू असून तिला या कटाची पूर्वकल्पना होती का, याचा तपास पोलीस करत आहेत.

गुन्हा दाखल
या प्रकरणी औसा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 521/2025 अंतर्गत भारतीय दंड संहिता कलम 103(1), 238 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि औसा पोलिसांच्या पथकाने समन्वयाने तपास करून हा गुन्हा उघडकीस आणला.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *