ऑपरेशन ‘नन्हे फरिश्ते’ अंतर्गत रेल्वे सुरक्षा बल, परभणीने अल्पवयीन मुलाला सुरक्षितपणे कुटुंबाला सुपूर्द केले

रेल्वे सुरक्षा बल (RPF) परभणी यांनी ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ या उपक्रमांतर्गत अल्पवयीन मुलाची यशस्वी सुटका करून त्याला सुरक्षितपणे त्याच्या कुटुंबाला सुपूर्द केले.
दि. 09 मार्च 2026 रोजी मानवत रोड रेल्वे स्थानकावर सुमारे 9 वर्षांचा एक मुलगा संशयास्पद अवस्थेत फिरताना आढळून आला. सतर्क प्रवासी श्री. अमोल सुरेश आंबेकर (वय 36 वर्षे), रा. जुना पेडगाव रोड, परभणी यांनी त्या मुलाला मदतीसाठी रेल्वे सुरक्षा बल RPF पोस्ट, परभणी रेल्वे स्थानक येथे आणून सुपूर्द केले.
रेल्वे सुरक्षा बल (RPF) अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता मुलाने आपले नाव देवेंद्र असे सांगितले. त्याने घरातील भांडणामुळे घर सोडून आल्याची माहिती दिली. तत्काळ कारवाई करत RPF अधिकाऱ्यांनी त्याच्या वडिलांशी संपर्क साधला. त्यांनी सांगितले की मुलगा त्या दिवशी शाळेतून निघून गेला होता.
चाईल्डलाईन 1098 पथकाच्या सहकार्याने मुलाला बालकल्याण समिती (CWC) समोर सादर करण्यात आले. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्या अल्पवयीन मुलाला सुरक्षितपणे त्याच्या वडिलांच्या ताब्यात देण्यात आले.
ऑपरेशन ‘नन्हे फरिश्ते’ अंतर्गत RPF द्वारे करण्यात आलेली ही त्वरित व समन्वित कारवाई रेल्वे परिसरात बालकांच्या सुरक्षा व संरक्षणाबाबत RPF ची कटिबद्धता अधोरेखित करते.



