जिला

निर्भीड लेखणीचा राष्ट्रीय गौरव : पत्रकार सूर्यकुमार यन्नावार आणि किशोरकुमार वागदरीकर यांना ‘मूकनायक नॅशनल अवॉर्ड – २०२६’ जाहीर

नांदेड | प्रतिनिधी पत्रकारिता, समाजप्रबोधन आणि सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून उल्लेखनीय कार्य करणारे दैनिक देशोन्नतीचे उपसंपादक सूर्यकुमार यन्नावार तसेच पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व “KK’s TIMES NEWS 24” चे संपादक किशोरकुमार वागदरीकर यांना प्रतिष्ठेचा ‘मूकनायक नॅशनल अवॉर्ड – २०२६’ जाहीर झाला आहे. ‘वीर शिरोमणी’ आणि ‘नंदगिरीचा कानोसा’ या दैनिकांच्या वर्धापन दिनानिमित्त या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात या निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे.

समाजातील न्याय, समता, बंधुता आणि प्रबोधनाच्या मूल्यांचा सातत्याने प्रचार-प्रसार करत सूर्यकुमार यन्नावार यांनी आपल्या प्रभावी आणि निर्भीड लेखणीतून पत्रकारितेला सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी माध्यम बनविले आहे. सामाजिक प्रश्नांवर परखड भाष्य, सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे आणि मानवतेचा संदेश जनमानसात पोहोचविण्याचे कार्य त्यांनी सातत्याने केले आहे. त्यांच्या संवेदनशील, अभ्यासपूर्ण आणि समाजहितवादी पत्रकारितेची दखल घेत त्यांना हा राष्ट्रीय स्तरावरील सन्मान जाहीर करण्यात आला आहे.

तर पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय योगदान देणारे किशोरकुमार वागदरीकर यांनीही आपल्या कार्यातून समाजसेवेचा आदर्श उभा केला आहे. दै. सकाळ, दै. भास्कर आणि दै. देशोन्नती यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांमध्ये कार्य केल्यानंतर सध्या ते “KK’s TIMES NEWS 24” या स्वतःच्या न्यूज पोर्टलच्या माध्यमातून सामाजिक, प्रशासकीय आणि जनहिताच्या विषयांवर प्रभावी लिखाण करत आहेत.

विशेष म्हणजे, सामाजिक क्षेत्रात कार्य करताना त्यांनी स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) आणि राष्ट्रीय जल जीवन मिशन अंतर्गत देशातील विविध राज्यांमध्ये जनजागृती करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. तसेच भारतातील प्रतिष्ठित लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी, मसुरी (LBSNAA) येथे प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकाऱ्यांना स्वच्छ भारत मिशन अंतर्गत मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्याचा मानही त्यांनी मिळविला आहे.

याशिवाय रक्तपेढीच्या माध्यमातून कार्य करत असताना त्यांनी हजारो गरजू रुग्णांना रक्तपुरवठा करून जीवनदान देण्याचे कार्य केले आहे. विविध गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांना आजही मदतीचा हात देत समाजसेवेची अखंड परंपरा त्यांनी जपली आहे. धाडसी, अभ्यासपूर्ण आणि लोकाभिमुख पत्रकारितेसोबतच सामाजिक बांधिलकीची जपणूक केल्याबद्दल त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन समाजप्रबोधनाची वाट चालणाऱ्या या दोन्ही पत्रकारांच्या कार्याचे विविध स्तरांतून कौतुक होत आहे. पत्रकारितेत प्रामाणिकपणा, सामाजिक उत्तरदायित्व आणि निर्भीडपणाचा आदर्श निर्माण करणाऱ्या या दोन्ही व्यक्तिमत्त्वांचा गौरव हा नांदेड जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.

हा भव्य पुरस्कार वितरण सोहळा येत्या १८ मे रोजी नांदेड येथे आयोजित करण्यात आला असून, *‘वीर शिरोमणी’*चे मुख्य संपादक शंकरसिंह ठाकूर आणि *‘नंदगिरीचा कानोसा’*चे मुख्य संपादक मारोती शिकारे यांनी पुरस्कार विजेत्यांची अधिकृत घोषणा केली आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल पत्रकार सूर्यकुमार यन्नावार आणि किशोरकुमार वागदरीकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *