किनवट येथे आकाशीय वीज कोसळून 16 वर्षीय शेख रशीदचा मृत्यू, गावात शोककळा

किनवट (अक्रम चौहान): कुंटलगत असलेल्या चिखली गावात एक दुर्दैवी घटना घडली असून, आकाशीय वीज कोसळल्याने 16 वर्षीय शेख रशीद याचा जागीच मृत्यू झाला. शेख रशीद हा चिखली गावाच्या उपसरपंचांचा मुलगा असून तो दहावीचा विद्यार्थी होता.
मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी परिसरात जोरदार पाऊस सुरू होता. याच वेळी शेख रशीद आपल्या तीन मित्रांसोबत घराच्या छतावर खेळत होता. अचानक आकाशात मोठ्या गडगडाटासह वीज कोसळली आणि ती थेट शेख रशीदच्या अंगावर पडली. या भीषण घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेत त्याच्यासोबत असलेले इतर तीन मुलगे देखील घाबरले असून त्यांना किरकोळ धक्का बसल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीय आणि गावकरी मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले.
अल्पवयात झालेल्या शेख रशीदच्या दुर्दैवी निधनाची बातमी संपूर्ण गावात पसरताच शोककळा पसरली. गावकऱ्यांनी हळहळ व्यक्त करत कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या.
दिवंगत शेख रशीद यांची अंत्ययात्रा आज सायंकाळी मगरीबच्या नमाजानंतर काढण्यात येणार असून, मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता आहे.



