शासकीय कार्यक्रमातील घटनेनंतर दिव्यांग युवकाच्या सक्षम हातालाही फ्रॅक्चर; उपचारासाठी खाजगी रुग्णालयाची धाव, प्रशासनाने तातडीने मदत करावी – राहुल साळवे

नांदेड, दि. २ जुलै : दिनांक २६ जून २०२६ रोजी नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे तत्कालीन पोलीस अधीक्षक मा. श्री. अविनाश कुमार यांच्या निरोप समारंभ व नवनियुक्त पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन यांच्या स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान दीर्घकाळ प्रतीक्षा, मूलभूत सुविधांचा अभाव आणि प्रकृती बिघडल्यामुळे दिव्यांग युवक कार्तिक कुमार भरतीपूरम हे अचानक खाली कोसळले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची बातमी वर्तमानपत्रातही प्रसिद्ध झाली होती.
मात्र, त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत आणखी बिघाड झाला असून, आधीच पॅरॅलिसिसमुळे एक हात व एक पाय बाधित असलेल्या कार्तिक यांच्या सक्षम हातालाही फ्रॅक्चर झाले आहे. त्यामुळे त्यांना स्वतः जेवणे, कपडे घालणे, शौचालयास जाणे तसेच दैनंदिन जीवनातील अत्यावश्यक कामे करणे अत्यंत कठीण झाले आहे.
घटनेनंतर त्यांना डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, विष्णुपुरी येथे नेण्यात आले. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागला. त्यामुळे उपचाराचा मोठा आर्थिक भार या कुटुंबावर पडला आहे.
कार्तिक कुमार भरतीपूरम हे वृद्ध आई-वडिलांचे एकुलते एक पुत्र असून त्यांना भाऊ किंवा बहीण नाही. त्यांच्या आजच्या अवस्थेमुळे वृद्ध आई-वडिलांवर मोठे मानसिक, शारीरिक आणि आर्थिक संकट ओढवले आहे.
सकल दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष, माजी अशासकीय सदस्य (संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती) तथा पत्रकार राहुल सिताराम साळवे यांनी जिल्हा प्रशासनाकडे संबंधित दिव्यांग युवकाला तातडीची आर्थिक मदत, संपूर्ण उपचाराचा खर्च, आवश्यक पुनर्वसन आणि सर्व शासकीय योजनांचा लाभ देण्याची मागणी केली आहे.
तसेच, सदर घटनेची वस्तुनिष्ठ चौकशी करून भविष्यात शासकीय कार्यक्रमांमध्ये दिव्यांगांसाठी पिण्याचे पाणी, बसण्याची व्यवस्था, व्हीलचेअर, वैद्यकीय पथक, आपत्कालीन आरोग्य सुविधा व इतर मूलभूत सोयी अनिवार्य करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
“दिव्यांगांचा सन्मान केवळ सत्कारापुरता मर्यादित न राहता त्यांच्या सुरक्षिततेची, आरोग्याची आणि सन्मानाने जगण्याची जबाबदारीही प्रशासनाने स्वीकारली पाहिजे. कार्तिक कुमार भरतीपूरम यांना तातडीने न्याय व मदत मिळावी,” अशी मागणी राहुल साळवे यांनी केली आहे.



