अर्धापूर व परळीतील ट्रॅक्टर चोरीचे गुन्हे उघड; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड : अर्धापूर पोलीस स्टेशन व परळी ग्रामीण (जि. बीड) हद्दीतील ट्रॅक्टर चोरीचे दोन गुन्हे स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांनी उघडकीस आणत आरोपीच्या ताब्यातून तब्बल ७ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांतील आरोपींचा शोध घेऊन गुन्हे उघड करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांना दिले होते. त्यानुसार पोउपनि साईनाथ पुयड व त्यांच्या पथकाने तपासाची मोहीम हाती घेतली.
१ जुलै २०२६ रोजी भोकर फाटा परिसरात गस्त घालत असताना पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, ट्रॅक्टर हेड चोरी करणारा एक संशयित आपल्या साथीदारासह परिसरात थांबला आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी शिवओम हॉटेलजवळ सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले.
चौकशीत त्याने आपले नाव महेश लक्ष्मण आखात (वय २४, रा. सातोना, ता. परतूर, जि. जालना) असे सांगितले. अधिक चौकशीत त्याने आपल्या चुलत भावासह विष्णू रामभाऊ आखात (वय ३२) याच्या मदतीने अर्धापूर-मालेगाव व इतर ठिकाणांहून दोन ट्रॅक्टर हेड चोरी केल्याची कबुली दिली.
तपासादरम्यान चोरीची मालमत्ता असल्याची माहिती असूनही ती विकत घेतल्याप्रकरणी चार जणांची नावे समोर आली. त्यामध्ये गजानन काळे, संदीप उगले, सुनील जयस्वाल आणि शहजाद जैदी यांचा समावेश आहे.
या कारवाईत पोलीस स्टेशन अर्धापूर गु.र.न. २६८/२६ आणि पोलीस स्टेशन परळी ग्रामीण, जि. बीड गु.र.न. २६३/२६ असे दोन गुन्हे उघडकीस आले. संबंधित गुन्ह्यांतील अंदाजे ७ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील (भोकर) व अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव (नांदेड) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक अतुल भोसले, पोउपनि साईनाथ पुयड तसेच स्थानिक गुन्हे शाखा व सायबर सेलच्या पथकाने या कारवाईत मोलाची भूमिका बजावली.



