जिला

डॉ. हंसराज वैद्य यांच्या पुढाकाराने वैद्य हॉस्पिटलमध्ये ‘वय वंदना’ शिबिराला विक्रमी प्रतिसाद

गेल्या रविवारीपेक्षा अधिक ज्येष्ठांनी घेतला मोफत आयुष्मान व वय वंदना कार्डाचा लाभ

 

नांदेड | प्रतिनिधी | दि. २८ जून महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या रविवारी नियमितपणे ज्येष्ठ नागरिकांसाठी आयुष्मान भारत व सत्तरी ओलांडलेल्या नागरिकांसाठी ‘वय वंदना कार्ड’ विनामूल्य काढून देण्याचे शिबिर वैद्य रुग्णालयात आयोजित करण्यात येत आहे. या उपक्रमाला ज्येष्ठ नागरिकांचा दिवसेंदिवस वाढता प्रतिसाद मिळत असून, गेल्या रविवारीपेक्षा या रविवारी १०० हून अधिक अतिरिक्त कार्डांची नोंदणी करण्यात आल्याने शिबिराने उपस्थितीचा नवा विक्रम नोंदविला आहे.

सुरुवातीच्या शिबिरांमध्ये मोठ्या प्रमाणावर ज्येष्ठ नागरिक उपस्थित राहत असल्याने सायंकाळी उशिरापर्यंत नोंदणी सुरू ठेवावी लागत होती. अनेक ज्येष्ठ नागरिकांना होणारी गैरसोय लक्षात घेऊन त्यांच्या आग्रहास्तव महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या रविवारी नियमित शिबिर घेण्याचा निर्णय घेण्यात आला. हे समाजोपयोगी कार्य ‘टीम आयुष्मान’ने स्वीकारले असून, या उपक्रमात इंजि. वामनराव गांजरे, इंजि. प्रकाशराव पत्तेवार, इंजि. पद्मजा आलूरकर, सौ. रश्मी वडवळकर, डॉ. हृदयकुमार कौरवार, प्रकाशराव पईतवार, विठ्ठलराव बिडवई आदी मान्यवर सातत्याने सहभागी होत आहेत.

आतापर्यंत २,७०० हून अधिक आयुष्मान व वय वंदना कार्डांचे वितरण करण्यात आले असून, त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना कोट्यवधी रुपयांच्या आरोग्य सुविधांचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हा उपक्रम भविष्यातही अखंडपणे सुरू राहणार असल्याचे संयोजकांनी सांगितले. अनेक ज्येष्ठ नागरिकांनी आता हे शिबिर महिन्याच्या चारही रविवारी आयोजित करण्याची मागणीही केली आहे.

या उपक्रमाला उत्तर मराठवाडा प्रादेशिक विभाग, नांदेडच्या वतीने डॉ. हंसराज वैद्य, प्रभाकर कुंटूरकर, गिरीश बाराळे, डॉ. लक्ष्मी पुरणशेट्टीवार, डॉ. पुष्पा कोकीळ, अॅड. एम. झेड. सिद्दिकी, रामचंद्र कोटलवार तसेच ज्येष्ठ पत्रकार व दलितमित्र माधवराव पवार-काटकळंबेकर यांचे सातत्यपूर्ण सहकार्य लाभत आहे.
संयोजकांनी ज्येष्ठ नागरिकांना आवाहन केले आहे की, शिबिरात येताना आधार कार्ड, आधारशी संलग्न मोबाईल क्रमांक, रेशन कार्ड सोबत आणावे तसेच कार्ड काढून घेणाऱ्या व्यक्तीने स्वतः उपस्थित राहणे आवश्यक आहे. नांदेड शहर व जिल्ह्यातील सर्व पात्र ज्येष्ठ नागरिकांनी या मोफत योजनेचा लाभ घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *