दैनिक मराठीबाणा समूहाचे विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार,
माहूरचे साईनाथ महाराज यांना जीवनगौरव तर दैनिक सामनाचे जिल्हा प्रतिनिधी विजय जोशी यांना पत्रकारिता क्षेत्रातील उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार

नांदेड, दि.१ (प्रतिनिधी)-समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणार्या मान्यवरांच्या कार्याचा गौरव करण्याच्या उद्देशाने दैनिक मराठीबाणा समूहाच्या वतीने जिल्हास्तरीय भव्य मान्यवर सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यात साईनाथ महाराज वसमतकर यांना जीवन गौरव तर पत्रकारिता क्षेत्रात प्रदीर्घ काळ कार्य करणार्या दैनिक सामनाचे जिल्हा प्रतिनिधी विजय जोशी यांनाही पुरस्कार जाहीर झाला आहे.
हा दिमाखदार सोहळा शनिवार, ५ जुलै रोजी दुपारी १२ वाजता, हॉटेल ताज पाटील येथे उत्साहात पार पडणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष कोलंबी मठाचे महंत श्री १०८ यदुबन महाराज राहणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
शिक्षण, आरोग्य, सामाजिक कार्य, उद्योग, कृषी, प्रशासन, पत्रकारिता, कला, क्रीडा, महिला सक्षमीकरण, युवा नेतृत्व तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणार्या मान्यवरांचा या सोहळ्यात सन्मान करण्यात येणार आहे. समाजासाठी निःस्वार्थपणे कार्य करणार्या व्यक्तींना योग्य व्यासपीठ मिळावे आणि त्यांच्या कार्याला प्रेरणादायी दाद मिळावी, या उद्देशाने दैनिक मराठीबाणा समूहाने हा उपक्रम हाती घेतला आहे.
या सोहळ्यास जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित व्यक्ती, लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. सन्मानित मान्यवरांच्या कार्याचा गौरव करताना समाजात सकारात्मक कार्य करणार्या व्यक्तींना नवी प्रेरणा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
दैनिक मराठीबाणा समूह सातत्याने समाजहिताचे उपक्रम, जनजागृती मोहीम आणि गुणवंतांचा गौरव करणारे कार्यक्रम राबवत असून, हा सन्मान सोहळा त्याच परंपरेतील एक महत्त्वपूर्ण उपक्रम ठरणार आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी या भव्य सोहळ्यास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
हे आहेत सत्कारमूर्ती
माहूरचे श्री साईनाथ महाराज वसमतकर यांना जीवनगौरव, जेष्ठ पत्रकार विजय जोशी यांना पत्रकारिता क्षेत्रातील माध्यमरत्न गौरव, रामदास पाटील सुमठाणकर यांना प्रेरणादूत, अॅड. अर्चित नाईक यांना सामाजिक कार्याबद्दल समाजभूषण, डॉ भगवान मनुरकर यांना कर्मयोगी कृषीभूषण, उमरीचे तहसीलदार श्रीमती मंजुषा भगत यांना तेजस्विनी प्रशासनरत्न, बालाजी बच्चेवार यांना उद्योगरत्न, कु. सोनिया कांबळे उत्कृष्ट हॉकीपट्टू, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रामकृष्ण गळधर यांना उत्कृष्ट प्रशासकीय सेवा, संतोष पाटील साखरे यांना युवकप्रेरणा, माजी नगराध्यक्ष सुनील बेजगमवार यांना उत्कृष्ट लोकनेतृत्व, डॉ. श्याम लखमावाड यांना जीवनसंजीवनी आरोग्यरत्न, शेषराव पाटील यांना शिक्षणरत्न पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे.



