क्राईम

मुदखेड येथे गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसासह एकास अटक

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; ३१ हजारांचा मुद्देमाल जप्त

 

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने मुदखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करत गावठी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसासह एका युवकास अटक केली. या कारवाईत पोलिसांनी सुमारे ३१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

दि. ३ ऑक्टोबर २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक रवी वाहुळे व त्यांचे पथक नांदेड ग्रामीण उपविभागाच्या हद्दीत अवैध धंद्यांविरोधात प्रतिबंधक कारवाईसाठी गस्त घालत होते. यावेळी गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, मुदखेड येथील उमरी रोडवरील संकल्प बारसमोर एक इसम कमरेला बेकायदेशीररीत्या पिस्तूल बाळगून उभा आहे.

माहितीची खात्री पटल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना अवगत करून पोलिसांनी दोन पंचांना सोबत घेत घटनास्थळी धाव घेतली. सायंकाळच्या सुमारास संकल्प बारसमोर अचानक छापा टाकून संशयित इसमाला ताब्यात घेण्यात आले.

चौकशीदरम्यान त्याने आपले नाव माधव बालाजी देशमुख (वय २७ वर्षे, व्यवसाय चालक, रा. कृष्णानगर, मुदखेड, ता. मुदखेड, जि. नांदेड) असे सांगितले. पंचांसमक्ष त्याची अंगझडती घेतली असता कमरेला खोवलेले विनापरवाना गावठी बनावटीचे सिल्व्हर रंगाचे लोखंडी पिस्तूल, मॅगझीनसह, अंदाजे ३० हजार रुपये किमतीचे तसेच पितळी धातूचे एक जिवंत काडतूस, अंदाजे एक हजार रुपये किमतीचे, असा एकूण ३१ हजार रुपयांचा मुद्देमाल आढळून आला.

सदर अग्निशस्त्र बाळगण्यासाठी आरोपीकडे कोणताही कायदेशीर परवाना नसल्याने पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पिस्तूल व काडतूस जप्त केले. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक बळीराम दासरे यांच्या फिर्यादीवरून माधव बालाजी देशमुख याच्याविरुद्ध मुदखेड पोलीस ठाण्यात गु.र.नं. १८९/२०२६, कलम ३/२५ भारतीय शस्त्र अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस पुढील कायदेशीर कारवाईसाठी मुदखेड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशाने, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक रवी वाहुळे, पोलीस उपनिरीक्षक बळीराम दासरे, माधव केंद्रे तसेच पोलीस अंमलदार देविदास चव्हाण, मोतीराम पवार व सोनसळे यांच्या पथकाने केली.

नांदेड जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणे, अवैध दारू, जुगार, गुटखा, अंमली पदार्थांची विक्री व साठवणूक तसेच इतर अवैध व्यवसाय करणाऱ्यांविरुद्ध भविष्यातही कठोर कायदेशीर कारवाई सुरू राहील, असा इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *