नांदेड पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ३० हरवलेले व चोरीस गेलेले मोबाईल मूळ मालकांना परत
४ लाख ५८ हजार रुपयांचे मोबाईल हस्तगत; नागरिकांना मोठा दिलासा

नांदेड, दि. १३ ऑक्टोबर २०२६ : नांदेड जिल्ह्यातील नागरिकांचे हरवलेले तसेच चोरीस गेलेले मोबाईल फोन शोधून मूळ मालकांना परत मिळवून देण्यासाठी नांदेड पोलिसांकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाने उल्लेखनीय कामगिरी करत एकूण ३० मोबाईल फोन शोधून हस्तगत केले आहेत. या मोबाईलची अंदाजे किंमत ४ लाख ५८ हजार रुपये असून, ते मूळ मालकांना परत करण्यात आले.
पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबविण्यात आली. मोबाईल फोनचे IMEI क्रमांक, पोलीस अभिलेख तसेच CEIR (Central Equipment Identity Register) प्रणालीच्या माध्यमातून तपास करून विविध ठिकाणांहून हे मोबाईल शोधण्यात आले.
दि. १३ ऑक्टोबर रोजी नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या हस्ते भाग्यनगर पोलीस ठाण्यात संबंधित तक्रारदारांना त्यांचे मोबाईल सन्मानपूर्वक परत करण्यात आले. हरवलेले मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांना आर्थिक व मानसिक दिलासा मिळाला असून, त्यांनी नांदेड पोलिसांचे आभार मानले.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, अपर पोलीस अधीक्षक रामेश्वर वंजने आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पार पाडली.
नागरिकांना पोलिसांचे आवाहन
मोबाईल हरवल्यास किंवा चोरीस गेल्यास नागरिकांनी घाबरून न जाता तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी. तसेच CEIR पोर्टलवर मोबाईलची माहिती नोंदवावी आणि मोबाईलचा IMEI क्रमांक सुरक्षितपणे जतन करून ठेवावा. यामुळे हरवलेला किंवा चोरीस गेलेला मोबाईल शोधण्याच्या प्रक्रियेला मदत होते.
नागरिकांच्या मालमत्तेचा शोध घेऊन ती त्यांना परत मिळवून देण्यासाठी नांदेड पोलीस सदैव प्रयत्नशील असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.



