नांदेडमध्ये डीआयजी शहाजी उमाप यांचा तक्रारदारांशी ‘जनसंवाद’; २६ तक्रारी प्राप्त
तक्रारींच्या जलद निवारणासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना; ‘संवेदना’ पोर्टलद्वारे होणार कार्यवाहीचा आढावा

नांदेड, दि. १३ ऑक्टोबर : नागरिकांच्या तक्रारी समजून घेऊन त्यांचे जलद निराकरण करणे, तसेच पोलीस आणि नागरिकांमधील संवाद वाढवून जनतेचा पोलिसांवरील विश्वास दृढ करण्याच्या उद्देशाने नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक श्री. शहाजी उमाप यांनी ‘जनसंवाद’ उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत मंगळवारी (दि. १३ ऑक्टोबर) नांदेड येथे तक्रारदारांशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. यावेळी एकूण २६ तक्रारदारांनी आपले लेखी अर्ज सादर केले.
पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप हे नांदेड परिक्षेत्रातील चारही जिल्ह्यांच्या पोलीस कामकाजाचा आढावा घेण्यासाठी दर महिन्याला जिल्हा मुख्यालयांना भेट देतात. या भेटीदरम्यान संबंधित जिल्ह्यातील तक्रारदारांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेणे आणि तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करणे, यावर भर दिला जात आहे.
१३ ऑक्टोबर रोजी नांदेड येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात जिल्हा पोलिसांच्या कामकाजाचा मासिक आढावा घेतल्यानंतर दुपारी ३ ते ५ या वेळेत शहाजी उमाप यांनी तक्रारदारांशी संवाद साधला. यावेळी मालमत्ताविषयक वाद, हरवलेले व्यक्ती, मारहाण, दाखल गुन्ह्यांचा तपास, फसवणूक आणि कौटुंबिक वाद अशा विविध विषयांवरील तक्रारी मांडण्यात आल्या.
प्राप्त तक्रारींची गांभीर्याने दखल घेत त्यांचा जलद निपटारा करण्यासाठी संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी आणि पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.
‘संवेदना’ पोर्टलद्वारे तक्रारींचा पाठपुरावा
तक्रारदारांच्या अर्जांवर तातडीने कार्यवाही व्हावी, यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयाने यापूर्वीच ‘संवेदना’ ही तक्रार निवारण प्रणाली सुरू केली आहे. जनसंवाद उपक्रमात प्राप्त झालेल्या सर्व अर्जांची नोंद या पोर्टलवर करून पुढील चौकशी व कार्यवाहीसाठी संबंधित अधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक तक्रारीवर झालेल्या कार्यवाहीचा आढावा नांदेड परिक्षेत्र कार्यालयातील फीडबॅक टीममार्फत घेतला जाणार आहे.
या वेळी नांदेडचे पोलीस अधीक्षक श्री. नीलाभ रोहन, अपर पोलीस अधीक्षक श्री. सूरज गुरख, जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी आणि शहरातील विविध पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते.
नागरिकांच्या तक्रारी थेट ऐकून त्यांचे निराकरण करण्यासाठी राबविण्यात येणारा हा उपक्रम पोलीस प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरत आहे.



