स्पोर्ट्स

युवा राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धा : तमिळनाडूचे मुला-मुलींचे संघ उपांत्य फेरीत; महाराष्ट्राच्या मुलींचीही आगेकूच

महाराष्ट्राचा तेलंगणावर ६८-५३ गुणांनी विजय; कर्नाटकचाही उपांत्य फेरीत प्रवेश

 

पुणे : पुण्यातील बालेवाडी इनडोअर स्टेडियम येथे सुरू असलेल्या मुख्यमंत्री चषक ४१व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत तमिळनाडूच्या मुला-मुलींच्या संघांनी दमदार विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. यासोबतच यजमान महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाने तेलंगणाचा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. कर्नाटकच्या मुलींच्या संघानेही छत्तीसगडवर मात करत अंतिम चार संघांमध्ये स्थान मिळवले.

मुलींच्या गटातील उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात महाराष्ट्राने तेलंगणाला ६८-५३ गुणांनी पराभूत केले. महाराष्ट्राकडून सिया भोसलेने १७ गुणांची, वैष्णवी परदेशीने ११ गुणांची, तर सायसा भगत आणि शरन्या सावंत यांनी प्रत्येकी १० गुणांची नोंद केली. तेलंगणाकडून सान्वी कोलेसेट्टीने १६ गुण मिळवले. या विजयामुळे महाराष्ट्राचा संघ उपांत्य फेरीत तमिळनाडूशी भिडणार आहे.

तमिळनाडूच्या मुलींच्या संघाने चंदीगडचा ९२-३९ गुणांनी एकतर्फी पराभव केला. तमिळनाडूकडून नक्षत्रा आर आणि एम. काविया यांनी प्रत्येकी १७ गुण करत संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.

दुसरीकडे, कर्नाटकच्या मुलींच्या संघाने छत्तीसगडवर ७९-५५ गुणांनी मात केली. कर्नाटककडून महेक शर्मा हिने २२, तर एच. एस. श्रेष्ठाने १५ गुण नोंदवले. छत्तीसगडकडून रुमी ओनवारने २२ गुण केले. उपांत्य फेरीत कर्नाटकचा सामना केरळ आणि हरियाणा यांच्यातील विजेत्या संघाशी होणार आहे.

मुलांच्या गटात तमिळनाडूचा गुजरातवर विजय

मुलांच्या गटातील उपांत्यपूर्व फेरीत तमिळनाडूने गुजरातचा ९३-८० गुणांनी पराभव केला. मागील साखळी सामन्यातील पराभवानंतर तमिळनाडूच्या संघाने पुन्हा लय मिळवत प्रभावी खेळ केला. तमिळनाडूकडून फ्योदोर अथिथन आणि भरत वाज यांनी प्रत्येकी १७ गुणांची नोंद केली. गुजरातकडून गर्वित ग्रोव्हरने १५ गुण मिळवले.

राजस्थानने केरळचा ८६-७० गुणांनी पराभव केला. राजस्थानकडून जय शर्मा याने २१, तर केरळकडून जोएल जोसने २१ गुण केले. उत्तर प्रदेशने चंदीगडवर ९४-४३ गुणांनी मोठा विजय मिळवला. उत्तर प्रदेशकडून तेजस बलियान आणि जतिन शर्मा यांनी प्रत्येकी १४ गुणांची नोंद केली, तर चंदीगडकडून यशेंदरने १७ गुण मिळवले.

या स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केल्याने यजमान संघाच्या कामगिरीकडे क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *