स्पोर्ट्स

युवा बास्केटबॉल राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींना विजय, मुलांचा पराभव

तामिळनाडूच्या मुला-मुलींची विजयी सलामी

 

 

पुणे : चिंधे पाटील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे सुरू झालेल्या सीएम चषक ४१व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाने गुजरातवर ८४-६१ असा दणदणीत विजय मिळवला. मात्र, मुलांच्या संघाला उत्तराखंडकडून ७५-१०८ असा पराभव स्वीकारावा लागला. दरम्यान, तामिळनाडूच्या मुला-मुलींच्या संघांनी विजयी सलामी देत स्पर्धेत दमदार सुरुवात केली.

मुलींच्या गटात महाराष्ट्राने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत पहिल्या सत्रात २८-१३ अशी आघाडी घेतली. त्यानंतरही संघाने सामन्यावरील पकड कायम ठेवली. दुसऱ्या सत्रात १७-१५, तिसऱ्या सत्रात २३-२१ आणि चौथ्या सत्रात १६-१२ अशी बाजी मारत महाराष्ट्राने सहज विजय नोंदवला. महाराष्ट्राकडून सिया भोसले हिने सर्वाधिक १८ गुण मिळवले. शरन्या सावंतने ११, तर वैष्णवी परदेशीने १० गुणांचे योगदान दिले. गुजरातकडून आशी पटेल हिने १५ गुण नोंदवले.

मुलींच्या अन्य सामन्यांत तामिळनाडूने दिल्लीचा ७३-३२ असा मोठा पराभव केला. या विजयात स्मिता एस. (१२ गुण) आणि करिश्मा के. (१० गुण) यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. केरळने छत्तीसगडवर ७०-३३, तर कर्नाटकने तेलंगणावर ६१-५१ अशी मात केली.

मुलांच्या गटात तामिळनाडूने पंजाबवर ९८-६७ असा एकतर्फी विजय मिळवला. पहिल्या सत्रात ३१-२४ अशी आघाडी घेणाऱ्या तामिळनाडूने दुसऱ्या सत्रात १९-१२ अशी बाजी मारत मध्यंतराला १४ गुणांची आघाडी मिळवली. मध्यंतरानंतरही संघाने वर्चस्व कायम ठेवत तिसऱ्या सत्रात २४-१५ आणि चौथ्या सत्रात २४-१६ अशी आघाडी घेत विजयावर शिक्कामोर्तब केले. तामिळनाडूकडून अरुणपांडी बी. आणि कौशिक राज सिंह यांनी प्रत्येकी १९ गुण नोंदवले. पंजाबकडून अमरिंदर मोहन सिंह याने २२ गुण मिळवले.

मुलांच्या अन्य सामन्यांत केरळने दिल्लीवर ७७-६३, राजस्थानने गुजरातवर १०२-८५, उत्तर प्रदेशने तेलंगणावर ७०-४१ आणि मध्य प्रदेशने दिल्लीवर ८२-४१ असा विजय मिळवला.

स्पर्धेचे उद्घाटन बास्केटबॉल फेडरेशन ऑफ इंडियाचे (बीएफआय) अध्यक्ष आधव अर्जुना यांच्या हस्ते झाले. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघटनेचे (एमएसबीए) अध्यक्ष संदीप जोशी, बीएफआयचे सचिव कुलविंदर सिंह गिल, एमएसबीएचे सचिव गोविंद कृष्णन मुथुकुमार यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. एमएसबीएचे सहसचिव ललित नहाटा यांनी आभार मानले.

स्पर्धेचे निकाल

मुलींचा गट :
केरळ विजयी, छत्तीसगडवर ७०-३३
महाराष्ट्र विजयी, गुजरातवर ८४-६१
तामिळनाडू विजयी, दिल्लीवर ७३-३२
कर्नाटक विजयी, तेलंगणावर ६१-५१

मुलांचा गट :
तामिळनाडू विजयी, पंजाबवर ९८-६७
केरळ विजयी, दिल्लीवर ७७-६३
राजस्थान विजयी, गुजरातवर १०२-८५
उत्तर प्रदेश विजयी, तेलंगणावर ७०-४१
मध्य प्रदेश विजयी, दिल्लीवर ८२-४१

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *