स्पोर्ट्स

केरळच्या मुलींची उपांत्यपूर्व फेरीत धडक; मध्य प्रदेशवर ७१-५० ने मात

सीएम चषक ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेत केरळच्या मुलींची अपराजित घोडदौड कायम; चंदीगड, हरियाणाच्या मुलींचीही आगेकूच

 

पुणे, दि. ३१ ऑक्टोबर : सुबधारा जयकुमार (१७ गुण), ब्रिसा बिनू (१२ गुण) आणि अक्षरा के. (१० गुण) यांच्या दमदार कामगिरीच्या जोरावर केरळच्या मुलींच्या संघाने मध्य प्रदेशवर ७१-५० अशी मात करत सीएम चषक ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. पुण्यात सुरू असलेल्या या स्पर्धेत केरळच्या मुलींनी साखळी फेरीतील सर्व सामने जिंकत आपली अपराजित घोडदौड कायम ठेवली.

महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघटनेच्या वतीने, भारतीय बास्केटबॉल महासंघाच्या मार्गदर्शनाखाली आठ दिवसांच्या या राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतून १६ वर्षांखालील भारतीय संघांची निवड केली जाणार आहे.

केरळच्या मुलींनी मध्य प्रदेशविरुद्धच्या सामन्यात सुरुवातीला संघर्ष केला. पहिल्या सत्रात मध्य प्रदेशने १५-१२ अशी आघाडी घेतली होती. मात्र, दुसऱ्या सत्रात केरळने जोरदार पुनरागमन करत २०-२ अशी निर्णायक आघाडी नोंदवली. त्यानंतर तिसऱ्या सत्रात २२-१५ आणि चौथ्या सत्रात १७-१८ अशी गुणांची नोंद झाली. अखेर केरळने ७१-५० असा विजय मिळवला. मध्य प्रदेशकडून दिव्यांशी शर्मा हिने सर्वाधिक १९ गुण नोंदवले.

मुलींच्या गटात दिल्लीने उत्तर प्रदेशचा अटीतटीच्या सामन्यात ६२-६० असा पराभव केला. दिल्लीकडून मायरा बाबरने १८, तर दिया सेहरावतने १२ गुणांची नोंद केली. उत्तर प्रदेशकडून साधना चौहान हिने २२ गुण मिळवले.

चंदीगड, हरियाणाच्या मुली विजयी

पात्रता बाद फेरीच्या सामन्यांत चंदीगडच्या मुलींनी पॉंडिचेरीचा ८४-३७ असा धुव्वा उडवला. चंदीगडकडून खुशी चौधरीने १८ गुण केले. हरियाणाच्या मुलींनी झारखंडवर ६८-१८ असा एकतर्फी विजय मिळवला. हरियाणाकडून कनिका हिने १७ गुण नोंदवले. या विजयांमुळे दोन्ही संघांनी पुढील फेरीत प्रवेश केला.

मुलांच्या गटात मध्य प्रदेश, राजस्थानचे विजय

मुलांच्या साखळी फेरीत मध्य प्रदेशने केरळचा ८३-४५ असा पराभव केला. मध्य प्रदेशकडून प्रशांत सिंहने सर्वाधिक २६ गुण मिळवले. राजस्थानने तेलंगणावर ८१-५० अशी मात केली. राजस्थानकडून अभिषेक चौधरीने २२ गुणांची नोंद केली.

पात्रता बाद फेरीत चंदीगडने कर्नाटकचा ८७-५३ असा पराभव केला. चंदीगडकडून यशेंद्रने २२, तर मुकुंद खोईवालने २० गुण नोंदवत विजयात मोलाचा वाटा उचलला.

दुसऱ्या चुरशीच्या सामन्यात उत्तराखंडने छत्तीसगडवर ६७-६३ अशी निसटती मात केली. उत्तराखंडकडून अमन खानने २५ गुण केले. चारही सत्रांत उत्तराखंडने २०-९, १३-१७, १०-१६ आणि २४-२१ अशी गुणांची नोंद करत अखेर विजय मिळवला.

ठळक निकाल
– मुली : केरळ ७१ – मध्य प्रदेश ५०
– मुली : दिल्ली ६२ – उत्तर प्रदेश ६०
– मुली : चंदीगड ८४ – पॉंडिचेरी ३७
– मुली : हरियाणा ६८ – झारखंड १८
– मुले : मध्य प्रदेश ८३ – केरळ ४५
– मुले : राजस्थान ८१ – तेलंगणा ५०
– मुले : चंदीगड ८७ – कर्नाटक ५३
– मुले : उत्तराखंड ६७ – छत्तीसगड ६३

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *