केरळच्या मुलींचा महाराष्ट्रावर १७ गुणांनी विजय; तेलंगणाचा उत्तर प्रदेशवर रोमहर्षक विजय
मुख्य यजमान महाराष्ट्राला केरळकडून पराभवाचा धक्का; ओव्हरटाइममध्ये तेलंगणाने मारली बाजी

पुणे : येथे सुरू असलेल्या सीएम चषक ४१व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेत मुलींच्या गटात केरळने गतविजेत्या आणि यजमान महाराष्ट्राचा ६२-४५ असा १७ गुणांनी पराभव करत शानदार विजय नोंदवला. बुधवारी झालेल्या या सामन्यात केरळच्या सुभद्रा जयकुमार (१७ गुण) आणि अॅना मरियम (१३ गुण) यांनी संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले.
सामन्याच्या पहिल्या सत्रात दोन्ही संघांनी १४-१४ अशी बरोबरी साधली. दुसऱ्या सत्रात महाराष्ट्राने १३-१२ अशी आघाडी घेत मध्यंतरापर्यंत एका गुणाची आघाडी मिळवली. मात्र, तिसऱ्या सत्रात केरळने १४-१० अशी आघाडी घेत सामन्यावर पकड मजबूत केली. अखेरच्या सत्रात केरळच्या खेळाडूंनी आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत २२-८ अशी बाजी मारली आणि महाराष्ट्राला ६२-४५ अशा फरकाने पराभूत केले. महाराष्ट्राकडून ध्रुवी पिसाळ आणि सिया भोसले यांनी प्रत्येकी ९ गुण नोंदवले.
तेलंगणाचा उत्तर प्रदेशवर ओव्हरटाइममध्ये विजय
मुलींच्या गटातील आणखी एका चुरशीच्या सामन्यात तेलंगणाने उत्तर प्रदेशचा ओव्हरटाइममध्ये ७४-७१ असा पराभव केला. निर्धारित वेळेत दोन्ही संघांनी प्रत्येकी ७० गुण मिळवल्याने सामना अतिरिक्त वेळेत गेला. अतिरिक्त वेळेत तेलंगणाने ४-१ अशी आघाडी घेत विजय निश्चित केला. तेलंगणाच्या सान्वी कोलिसेट्टीने २४ गुणांची दमदार कामगिरी केली, तर उत्तर प्रदेशच्या प्रिया राणाने १८ गुण नोंदवले.
मुलांच्या गटात उत्तर प्रदेश, राजस्थान आणि तामिळनाडू विजयी
मुलांच्या गटात उत्तर प्रदेशने गुजरातचा ८९-४८ असा मोठ्या फरकाने पराभव केला. उत्तर प्रदेशच्या तेजस बलियानने २९ गुणांची नोंद करत विजयात मोलाचा वाटा उचलला. गुजरातकडून अमित सारियाने २५ गुण मिळवले.
दुसऱ्या सामन्यात राजस्थानने हरियाणावर ८९-८३ असा सहा गुणांनी विजय मिळवला. राजस्थानच्या हिमांशूने २९, तर अक्षय नायकने १६ गुण नोंदवले. हरियाणाकडून शिवमने १७ गुण मिळवले.
तामिळनाडूने केरळचा ८९-५६ असा पराभव करत स्पर्धेतील आपली ताकद दाखवून दिली. तामिळनाडूकडून सर्वेश रघूने २३ आणि फ्योडोर अथिथनने १९ गुण मिळवले. केरळच्या अल्ड्रिन अँटो अॅलेक्सने २२ गुण नोंदवले.
सामन्यांचे निकाल
मुलींचा गट
– तेलंगणा ७४ — उत्तर प्रदेश ७१ (ओव्हरटाइम)
– केरळ ६२ — महाराष्ट्र ४५
मुलांचा गट
– उत्तर प्रदेश ८९ — गुजरात ४८
– राजस्थान ८९ — हरियाणा ८३
– तामिळनाडू ८९ — केरळ ५६



