लोककला महोत्सवाला रसिक प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा (मीडिया सेंटर), 4 जानेवारी- महाराष्ट्र राज्याच्या गौरवशाली परंपरेचे आणि लोककलेचे जतन करण्यासाठी व लोककलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेत आयोजीत पारंपारिक लोककला महोत्सवाला रसिक प्रेक्षकांना उदंड प्रतिसाद दिला.

नांदेड जिल्हा परिषद व लोहा पंचायत समितीच्या वतीने श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेनिमित्त आयोजित पारंपारिक लोककला महोत्सवाचे दरवर्षी माळेगावात आयोजन करण्यात येते. आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते श्री खंडोबाच्या प्रतिमेचे पुजन करुन दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांचा काठी आणि घोंगडी देवून सत्कार करण्यात आला. शाहीर रमेश गिरी यांच्या महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
कारभारी दमानं… होऊ द्या दमानं, बाई मी लाडाची… कैरी पाडाची.. आजकाल पाटलाचा लई रुबाब…. आबा सरकून बसा…. विविध लावण्या, खंडोबा गीत, वेस्टर्न, ग्रुप डान्स सादर केले.
यावेळी रघुवीर खेडकर तमाशा मंडळ, पांडुरंग मुळे नाट्य मंडळ, आनंद लोकनाट्य मंडळ, सविताराणी पुणेकर, हरीभाऊ बडे नगरकर व शिवकंन्या बडे नगरगर यांसह विविध कलाकारांनी गण, गवळण, बतावणी, रंगबाजी, लावणी व इतर पारंपारिक कला सादर करून रसिकांची मने जिंकली.
तमाशा मंडळातील कलाकारांनी सादर केलेल्या चंद्रा व बाई मी लाडाची ग कैरी पाढाची….. या लावणीवर रसिक थिरकले. अनेक लावण्या वन्स मोर ठरल्या. अनेक जिवंत लोककलेचे बहुरंगी दर्शन यानिमित्त रसिक प्रेक्षकांना पाहावयास मिळाले. या कार्यक्रमाला लाखो रसिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन चंद्रकांत मेकाले यांनी केले. गट विकास अधिकारी दशरथ आडेराघो, सहाय्यक गट विकास अधिकारी सुनीता वानखेडे, सहाय्यक प्रशासन अधिकारी एस. डी. चोरमले, पी.एम. वाघमारे, विस्तार अधिकारी धनंजय देशपांडे, आर.बी. टेंभुर्णे, एम. एस. म्हेत्रे, दत्ता चोंडेकर, युसुफ शेख, संतोष गायकवाड, पि.के. वाडीकर आदींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.



