ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजनेतील पात्र-अपात्र यादी जाहीर; त्रुटी पूर्ततेसाठी १३ मार्चपर्यंत मुदत

नांदेड, दि.११- पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या शासन निर्णयानुसार राबविण्यात येणाऱ्या राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजना २०२५-२६ अंतर्गत जिल्ह्यातील अर्जांची छाननी पूर्ण करण्यात आली असून पात्र व अपात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती उप मुख्य कार्यकारी अधिकारी डी.बी. गीरी यांनी दिली आहे.
सदर योजनेअंतर्गत प्राप्त अर्जांची छाननी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडून करण्यात आली. या छाननीदरम्यान काही अर्जांमध्ये अपूर्ण कागदपत्रे, निकषांची पूर्तता न होणे आदी कारणांमुळे काही अर्ज अपात्र ठरविण्यात आले आहेत. छाननीनुसार नांदेड जिल्ह्यातील एकूण ६३५ अर्जांपैकी ४७७ अर्ज पात्र तर १५८ अर्ज अपात्र ठरले आहेत. अपात्र लाभार्थ्यांची कारणासहित सविस्तर यादी विभागाच्या संकेतस्थळावर तसेच सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आली आहे, जेणेकरून संबंधित अर्जदारांना आवश्यक त्रुटी दुरुस्त करण्याची संधी मिळू शकेल.
त्रुटी पूर्ततेसाठी कालबद्ध कार्यक्रम निश्चित करण्यात आला असून ४ मार्च २०२६ रोजी पात्र-अपात्र यादी जाहीर केली जाईल. अपात्र अर्जदारांना १३ मार्च २०२६ पर्यंत आवश्यक कागदपत्रे सादर करून त्रुटी दूर करण्याची संधी दिली आहे. त्यानंतर १६ मार्च रोजी सुधारित यादी तयार केली जाईल आणि १८ मार्च २०२६ रोजी अंतिम पात्र यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
संबंधित अर्जदारांनी आवश्यक कागदपत्रांसह ग्रामपंचायत विभाग, जिल्हा परिषद नांदेड येथे संपर्क साधून त्रुटी पूर्तता करावी. निर्धारित अंतिम दिनांकानंतर कोणतीही दाद स्वीकारली जाणार नाही, असे सदस्य सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत), जिल्हा परिषद नांदेड यांनी कळविले आहे.



