जागतिक महिला दिन: जिल्ह्यात विविध उपक्रम स्वच्छता जनजागृतीसह महिलांचा सन्मान

नांदेड, 7- जागतिक महिला दिनानिमित्त नांदेड जिल्ह्यात आज विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जलशक्ती मंत्रालय तसेच राज्य पाणी व स्वच्छता विभाग तसेच जिल्हा परिषदेच्या वतीने या उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
जागतिक महिला दिनानिमित्त जिल्ह्यातील स्वच्छता व पाणी व्यवस्थापन क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात येणार आहे. राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानांतर्गत गाव पातळीवर विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. ग्रामपंचायतींमध्ये विशेष महिला सभा घेऊन पाणी स्वच्छता व आरोग्यविषयक समस्या तसेच उपाययोजनांवर चर्चा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांमध्ये स्वंय सहाय्यता गट, महिला स्वच्छता कर्मचारी, किशोरवयीन मुली, ग्राम आरोग्य व पोषण समिती सदस्य तसेच स्थानिक महिला नेतृत्व यांचा सहभाग असणार आहे. महिला दिनानिमित्त गावस्तरावर वॉश रनचे आयोजनही केले जाणार आहे.
जिल्हयातील सर्व गावातून या कार्यक्रमांची प्रभावी आयोजन करण्यासाठी गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांनी समन्वय साधून जागतिक महिला दिवस मोठया उत्साहात साजरा करण्यात यावा असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संतोष तुबाकले, ग्रामपंचायत विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे, महिला व बालविकास विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात तसेच जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक तथा उप मुख्य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ यांनी केले आहे.



