नांदेडमध्ये खंडणीसाठी दुकानाला आग; दोन ते तीन लाखांचे नुकसान आरोपी पसार

नांदेड, 14 एप्रिल 2025: आनंदनगर येथील ‘दरबार द रॉयल मेन्स वेअर’ या कपड्याच्या दुकानात खंडणीसाठी करण्यात आलेल्या आगीत दोन ते तीन लाख रुपयांचे मोठे नुकसान झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेचे तपशील:
फिर्यादी गोविंद गंगाराम नरवाडे (वय २८, रा. पावडेवाडी नाका, पुष्पा नगर, नांदेड) यांच्या तक्रारीनुसार, दिनांक १४ एप्रिल रोजी सायंकाळी चारच्या सुमारास, आरोपी सोनू जोधळे (रा. श्रीनगर पोलीस कॉलनी, नांदेड) व त्याच्यासोबत असलेल्या एका अनोळखी व्यक्तीने फिर्यादीच्या दुकानात प्रवेश केला.
दुकानात काम करणाऱ्या ओमसाई याला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देत, “माझ्या मालकाला सांग, मला महिन्याला ५००० रुपये खंडणी पाहिजे,” असे म्हणत रॉकेल टाकून दुकानात आग लावली. या आगीत अंदाजे दोन ते तीन लाख रुपयांचे नुकसान झाले.
गुन्हा दाखल व तपास सुरू:
या प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १४२/२०२४ कलम 308(3), 326(F), 324(4)(5), 352, 351(2)(3), 3(5) भा.न्या.सं.-2023 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोहेकॉ/2305 आव्हाड करत आहेत.
पोलिसांकडून आरोपींच्या शोधासाठी पथके तैनात करण्यात आली असून, या गंभीर प्रकरणाची चौकशी युद्धपातळीवर सुरू आहे.



