कर्तव्यदक्ष ऑटोचालकाचा प्रामाणिकपणा : विसरलेली बॅग व २०,००० चा मोबाईल परत करून दिला, माणुसकीचा आदर्श घालून दिला

नांदेड (प्रतिनिधी) – आजच्या काळात प्रामाणिकपणा हा दुर्मिळ होत चाललेला गुण असला तरीही समाजात अजूनही काही माणसं अशी आहेत जी आपल्या प्रामाणिक वर्तनातून इतरांसाठी प्रेरणास्थान ठरतात. अशाच एका प्रामाणिक आणि प्रेरणादायी प्रसंगाला नांदेड शहराने दिनांक २० एप्रिल २०२५ रोजी साक्षीदार ठरले.
टायगर ऑटो रिक्षा संघटनेचे सदस्य विलास अनेराव (रा. पांडुरंग नगर, नांदेड) हे नेहमीप्रमाणे रिक्षा चालवत असताना, प्रवासी ताराबाई कुराडे व त्यांचे पती हे दाम्पत्य हिंगोली गेट ते मस्तानपुरा असा प्रवास करत होते. मस्तानपुरा येथे उतरल्यानंतर त्यांना लक्षात आले की, मोबाईल (किंमत ₹२०,०००/-) व बॅग रिक्षामध्येच विसरली आहे.
घाबरलेल्या या दाम्पत्याने आपल्या नातेवाईक गजानन कट्टे यांना संपर्क केला. त्यांनी तत्काळ विलास अनेराव यांच्याशी फोनवर संपर्क केला. विलास अनेराव यांनी फोन उचलून सांगितले की, “हो, आपली बॅग व मोबाईल माझ्या रिक्षात आहेत.” त्यांनी लगेच संघटनेचे अध्यक्ष अहेमद बाबा यांना याबाबत माहिती दिली. अध्यक्षांनी मार्गदर्शन करून प्रवाशांना घेऊन इतवारा पोलीस स्टेशन येथे बोलावले.
तेथे बॅग आणि मोबाईल प्रवाशांना सुरक्षितपणे परत करण्यात आले. या वेळी वाहतूक सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. इंगोले साहेब, जमादार हमदे साहेब, देवकते साहेब, मुंडे साहेब, तसेच टायगर संघटनेचे पदाधिकारी – प्रदेशाध्यक्ष अहेमद बाबा, महाराष्ट्र उपाध्यक्ष शेख तय्यब, जिल्हाध्यक्ष शेख अहेमद, शहराध्यक्ष मुखीद पठाण, शहर उपाध्यक्ष पिंटू गजभारे हे उपस्थित होते.
या प्रसंगी गजानन कट्टे यांनी विलास अनेराव यांना ₹२००/- चे बक्षीस देत त्यांचा गौरव केला व त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल मनःपूर्वक आभार मानले.
हा प्रसंग नांदेडकरांसाठी माणुसकी, प्रामाणिकपणा आणि सामाजिक जबाबदारी यांचा सुंदर संगम घडवणारा आदर्श ठरला आहे.



