इंस्टाग्रामवर पोस्ट करून दहशत निर्माण करणाऱ्या आरोपीवर नांदेड ग्रामीण पोलीसांची कारवाई; नकली पिस्तूल व एअरगन जप्त

नांदेड, दि. 28 एप्रिल 2025 – सोशल मीडियावर ‘बाप तो बाप होता है’ अशा प्रकारचे गाणे वापरून दहशत निर्माण करणाऱ्या एकाच्या विरोधात नांदेड ग्रामीण पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे. आरोपी शेख नदीम शेख मंजूर (वय 31), रा. खुदबेईनगर, नांदेड याने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता, ज्यामध्ये तो नकली लोखंडी पिस्तूल व एअरगन दाखवून जनतेमध्ये भीती व तणाव निर्माण करीत होता.
पोलीस अधीक्षक मा. श्री. अविनाश कुमार यांच्या ‘ऑपरेशन फ्लश आउट’ मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. या मोहिमेचा उद्देश समाजात दहशत निर्माण करणाऱ्या प्रवृत्तींवर नियंत्रण ठेवणे हा आहे.
गुन्ह्याची तपशीलवार माहिती अशी:
पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर मटवाड आणि गुन्हे शोध पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीवरून आमेना मजीदजवळ मंलगबाबा बिल्डिंग परिसरात छापा टाकून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 1 नकली लोखंडी पिस्तूल व 1 एअरगन (एकूण किंमत ₹10,000/-) जप्त करण्यात आले आहेत.
या प्रकरणी आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 353(1)(ब), 353(2) अंतर्गत गु.र.नं. 412/2025 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर, उपनिरीक्षक मटवाड, वसंत केंद्रे, गटलेवार, विष्णु कल्याणकर, रामदास आवळे या पथकाने ही यशस्वी कारवाई पार पाडली असून त्याचे वरिष्ठांकडून विशेष कौतुक करण्यात आले आहे. या गुन्ह्याचा तपास सध्या पोउपनि. कदम करत आहेत.



