जिल्हा परिषदेतील सर्वसाधारण बदल्या उद्यापासून; वेळापत्रक जाहीर
समुपदेशनाव्दारे पारदर्शक बदली प्रक्रिया- सीईओ मेघना कावली

नांदेड,4- जिल्हा परिषदेतील गट-क (वर्ग 3) व गट-ड (वर्ग 4) च्या कर्मचाऱ्यांच्या सन 2025 मधील सर्वसाधारण बदल्या उद्या दिनांक 6 मेपासून पार पडणार आहेत. या बदल्या जिल्हास्तरावर पारदर्शक व समुपदेशन प्रक्रियेव्दारे होणार असून, महाराष्ट्र शासनाच्या दिनांक 15 मे 2014 च्या शासन निर्णयानुसार ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे. कोणत्याही कर्मचाऱ्याने आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली यांनी केले आहे.
समुपदेशन दिनांक 6 ते 9 मे 2025 दरम्यान जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात होणार आहेत. प्रत्येक विभागासाठी ठरावीक वेळ निश्चित करण्यात आला आहे. बदल्या केवळ पात्र कर्मचाऱ्यांच्या विनंती अर्ज व वास्तव्य जेष्ठतेनुसारच करण्यात येणार आहेत. दिनांक 6 मे रोजी सकाळी 10 ते 12 यावेळेत वित्त विभाग, जलसंधारण विभाग दुपारी 12 ते 1 तर सामान्य प्रशासन विभागाच्या बदल्या दुपारी 1 ते बदली प्रक्रिया संपेपर्यंत पारपडतील. 7 मे रोजी सकाळी 10 ते 11 कृषी विभाग, सकाळी 11 ते 1 पशुसंवर्धन विभाग तर प्राथमिक शिक्षक वळून शिक्षण विभागातील बदली प्रक्रिया दुपारी 1 ते बदली प्रक्रिया संपपेर्यंत.
दिनांक 8 मे रोजी महिला व बालकल्याण विभाग सकाळी 10 ते दुपारी 12 पर्यंत तर आरोग्य विभागातील बदल्या दुपारी 1 ते बदली प्रक्रिया संपेपर्यंत पारपडतील. दिनांक 9 मे रोजी बांधकाम विभाग सकाळी 10 ते दुपारी 12, ग्रामीण पाणी पुरवठा दुपारी 12 ते 1 तर ग्रामपंचायत विभागाच्या बदल्या दुपारी 1 ते बदली प्रक्रिया संपेपर्यंत होतील. दिव्यांग, कर्मचारी तसेच वैद्यकीय कारणावरुन बदलीतुन सुट मागणी केलेल्या व तसेच बदली मध्ये प्राधान्य मागणी केलेल्या कर्मचाऱ्यांचे वैद्यकीय कागदपत्रे तपासणी करण्यासाठी संपुर्ण बदली प्रक्रियेत आरोग्य विभागाचे पथक नियुक्त करण्यात आलेले आहे. तसेच पूर्ण बदली प्रक्रियेच्या वेळेस आरोग्य विभागाचे पथक उपस्थित राहणार आहे.
जिल्हा परिषद परिसरात सीसीटीव्हीच्या माध्यमातून सर्व हालचालींवर लक्ष ठेवण्यात येणार असून, बदली प्रक्रियेदरम्यान व्हिडीओ श्युटींग केली जाणार आहे. कोणताही अनुशासनभंग अथवा गैरप्रकार आढळल्यास संबंधितांवर कठोर शिस्तभंगात्मक कारवाई केली जाईल. बदल्यांच्या प्रक्रियेमध्ये कोणताही दबाव, आमिष अथवा मध्यस्थी सहन केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली व सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार यांनी दिला. कर्मचाऱ्यांनी कायदेशीर व पारदर्शक व्यवस्थेवर विश्वास ठेवावा व कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.



