खुनाच्या गुन्ह्यातील एक वर्षांपासून फरार सराईत गुन्हेगार जेरबंद — स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कामगिरी

नांदेड (प्रतिनिधी): ६ मे / पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीणच्या हद्दीत २०२४ मध्ये घडलेल्या खुनाच्या प्रकरणात एक वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने तुप्पा पाटी येथून अटक केली आहे. आरोपीचे नाव महम्मद शहबाज मोहम्मद हारून (वय २७, रा. मगदुमनगर, नांदेड) असे असून, तो अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये सामील असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. अभिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव व खंडेराव धरणे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. उदय खंडेराय, सहा. पो.नि. आर. व्ही. वाहुळे आणि त्यांच्या पथकाने केली.
तपास पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून ८ मे २०२५ रोजी तुप्पा पाटी येथे सापळा रचून आरोपीला अटक करण्यात आली. अंगझडतीत आरोपीकडे एक खंजर व मोबाईल टॉवरच्या चोरीच्या २१ बॅटऱ्या (किंमत ₹२२,०००/-) हस्तगत करण्यात आल्या.
अधिक चौकशीत आरोपीने पोलीस स्टेशन उस्माननगर हद्दीत मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या चोरी केल्याचे कबूल केले. तसेच, तो उत्तर प्रदेशात दरोड्याच्या गुन्ह्यातही सहभागी होता व तिथूनही फरार होता.
आरोपीवर पो.स्टे. नांदेड ग्रा. गु.र.नं. 302/2025 कलम 302, 307, 143, 147, 148, 149 भादंवि अंतर्गत गुन्हा दाखल आहे. अटक केल्यानंतर आरोपीला नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
या यशस्वी कार्यवाहीबद्दल मा. पोलीस अधीक्षक श्री. अभिनाश कुमार यांनी संपूर्ण पथकाचे अभिनंदन केले असून, गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अशा कारवायांची गरज असल्याचे सांगितले.



