दुकाने फोडणारी अंतरजिल्हा टोळी जेरबंद — स्थानीक गुन्हे शाखेची यशस्वी कारवाई

नांदेड (प्रतिनिधी): दि. ६ मे / शहरात व परिसरात चोरीच्या घटनांनी नागरिक त्रस्त असतानाच नांदेड स्थानीक गुन्हे शाखेने मोठी कामगिरी करत अंतरजिल्हा दुकान फोडणारी टोळी जेरबंद केली आहे. या प्रकरणात शंकर ऊर्फ सोनू पिराजी पवार (वय २२, रा. कारखाना रोड, वसमत, जि. हिंगोली) याला अटक करण्यात आली असून त्याच्यासोबत तीन विधीसंघर्षग्रस्त बालकांचा समावेश आहे.
या टोळीने तामसा, उस्माननगर (नांदेड) आणि औंढा (हिंगोली) येथे दुकाने फोडून चोरी केल्याची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून मोटारसायकल, मोबाईल, व रोख २२,००० रुपये असा एकूण ९२,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. अभिनाश कुमार यांच्या आदेशानुसार व अपर पोलीस अधीक्षक श्री. खंडेराव धरणे (भोकर), श्री. सूरज गुरव (नांदेड) यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. उदय खंडेराय, पो.उ.नि. साईनाथ पुयड यांच्या नेतृत्वाखाली केली गेली.
गोपनीय माहितीच्या आधारे ७ मे २०२५ रोजी पासदगाव ब्रिज येथे सापळा रचून आरोपीला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने आणि तीन बालकांनी मिळून चोरी केल्याचे मान्य केले.
या टोळीविरुद्ध तामसा, उस्माननगर व औंढा पोलीस ठाण्यांमध्ये आधीपासूनच ४ गुन्हे दाखल आहेत. अटक केल्यानंतर या सर्व गुन्ह्यांतील मुद्देमाल व आरोपी तामसा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहेत.
मा. पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांनी या यशस्वी कारवाईबद्दल श्री. साईनाथ पुयड व त्यांच्या पथकाचे विशेष कौतुक केले आहे.



