मातोश्री कृष्णाबाई नरवाडे यांचा अमृत महोत्सव; भिक्खू संघास भोजनदान

नांदेड, १६- संपूर्ण आयुष्य कुटुंबासाठी समर्पित करत निस्वार्थ सेवा, त्याग, कष्ट आणि मायेचा अनमोल ठेवा जपणाऱ्या मातोश्री कृष्णाबाई नामदेवराव नरवाडे यांचा ७५ वा अमृत महोत्सव अत्यंत आनंदात व उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने बावरी नगर दाभड येथील भिक्खू संघास भोजनदान करण्यात आले. तसेच नांदेड येथील जान्हवी मुलींच्या वसतिगृहात मिठाईचे वाटप करण्यात आले. त्यानंतर नांदेड येथे कृष्णाबाई नरवाडे यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
ज्यांच्या अपार कष्टाने आमच्या जीवनाचे सोने झाले, त्या आमच्या आधारवडास कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा हा सोहळा आहे, अशा भावनिक शब्दांत नरवाडे कुटुंबीयांनी आपली भावना व्यक्त केली. या विशेष दिवशी नरवाडे कुटुंबातील आप्तेष्ट, नातेवाईक व अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवली. या प्रसंगी कविता मुकुंद नरवाडे, ञिशला संजय नरवाडे, राजू नामदेवराव नरवाडे, रंजना शिवाजी रणवीर, सुवर्णमाला प्रमोद रणवीर, वंदना सिद्धार्थ रणवीर आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे उद्घाटन मातोश्री कृष्णाबाई यांच्या लाडक्या नातवंडांच्या हस्ते झाले. कार्यक्रमस्थळी कृष्णाबाई यांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण क्षणांची छायाचित्रे स्टँडीजच्या स्वरूपात मांडण्यात आली होती, ज्यांनी उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले. कृष्णाबाई यांच्या जिवलग मैत्रिणींनी हा सोहळा अद्भुत व संस्मरणीय असल्याचे मत व्यक्त केले. प्रत्येक घरात नरवाडे बंधूंप्रमाणे एकत्र, सुसंवादी तसेच सन्मानाने जगणारे कुटुंब असावे, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली. बुद्ध विचारांनी प्रेरित असलेल्या मातोश्री कृष्णाबाई यांचे जीवन म्हणजे संयम, कर्तव्यनिष्ठा व मायेचा जिवंत पाठ आहे. त्यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने त्यांच्या जीवनप्रवासाला, त्यागमय कार्याला व कुटुंबप्रेमाला कुटुंबीयांनी साजेसा सन्मान दिला



