देगलूर नाका परिसरातील मिल्लत नगर, गल्ली नं. ७ येथील नागरिक मूलभूत सुविधा नसल्यामुळे त्रस्त, महापालिकेच्या दुर्लक्षावर नागरिक संताप

नांदेड, १७ मे: देगलूर नाका परिसरातील मिल्लत नगर गल्ली नं. ७ येथील नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून मूलभूत नागरी सुविधांपासून वंचित आहेत. रस्ते, गटारे, पाणीपुरवठा, ड्रेनेज लाईन या अत्यावश्यक सुविधा उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांचे जनजीवन कठीण झाले आहे. संपूर्ण गल्लीत ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिग साचले असून पावसाळ्यात रस्ते चिखलमय होतात, त्यामुळे नागरिकांना चालणेही मुश्किल झाले आहे.
स्थानिक नागरिकांनी सांगितले की, महापालिकेची मुदत संपून तीन वर्षे झाली असून अजूनही स्थानिक नगरसेवक निवडला गेलेला नाही. त्यामुळे त्यांच्या समस्या ऐकून घेणारा व सोडवणूक करणारा कोणीही नाही. लोकप्रतिनिधीचा अभाव असल्यामुळे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.
गटारींचा अभाव, सांडपाण्याचा योग्य निचरा न होणे, कचऱ्याचा साचलेला ढिग आणि नियमित स्वच्छतेचा अभाव यामुळे नागरिकांना दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव व आजारांचा धोका वाढला आहे. नागरिकांनी वेळोवेळी तक्रारी केल्या असल्या तरी महापालिकेने कोणतीही कारवाई केलेली नाही.
या सगळ्या परिस्थितीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची भावना असून त्यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की, जर लवकरात लवकर सुधारणा केली नाही, तर तीव्र आंदोलन छेडले जाईल. नागरिकांनी मागणी केली आहे की, तात्काळ रस्ते दुरुस्ती, गटार व ड्रेनेज लाईन टाकणे आणि नियमित स्वच्छता व्यवस्था सुरू करण्यात यावी.



