नांदेड : पोलीस दलासाठी एआय कार्यशाळा – एमकेसीएलच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय कामकाजात नवदिशा

जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, नांदेड येथे आज कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि तंत्रज्ञानाचा प्रशासकीय कामकाजातील प्रभावी वापर या विषयावर दोन तासांची उपयुक्त कार्यशाळा पार पडली. एमकेसीएल, पुणेचे विभागीय व्यवस्थापक (पुणे व उत्तर महाराष्ट्र विभाग) श्री. विनायक कदम यांनी या कार्यशाळेत उपस्थित सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचार्यांना सखोल प्रशिक्षण दिले.
ही कार्यशाळा जिल्हा पोलीस अधीक्षक नांदेड श्री. अभिनाश कुमार (भा.पो.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली, अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. खंडेराव धरणे, जिल्हा पोलीस उपाधीक्षक डॉ. अश्विनी जगताप आणि सायबर विभागाचे पोलीस उपनिरीक्षक श्री. मारुती चव्हाण यांच्या विशेष पुढाकारातून आयोजित करण्यात आली होती. एमकेसीएलचे जिल्हा समन्वयक श्री. पंढरीनाथ आघाव आणि त्यांच्या टीमने संपूर्ण कार्यशाळेची समन्वय जबाबदारी पार पाडली.
कार्यशाळेत श्री. विनायक कदम यांनी सांगितले की, AI हा आपल्या रोजच्या जीवनाचा भाग झाला असून, प्रशासकीय कामकाजात याचा वापर केल्यास वेळेची बचत, अचूकता आणि नागरी सेवेत सुलभता येते. त्यांनी विविध AI टूल्सची थेट प्रात्यक्षिके दाखवून, त्यांचा वापर प्रशासकीय कामात कसा करता येईल याची सविस्तर माहिती दिली.
विशेष म्हणजे, एमकेसीएलने 1 जानेवारी 2025 पासून महाराष्ट्रातील जिल्हाधिकारी कार्यालये, जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि पोलीस विभागांसह विविध शासकीय कार्यालयांमध्ये AI विषयक 100 कार्यशाळा आयोजित केल्या असून, आजची कार्यशाळा याच मालिकेतील 46 वी कार्यशाळा ठरली.
मुख्यमंत्री महोदयांच्या ‘100 दिवस कृती कार्यक्रम’ अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या या कार्यशाळांना मुख्यमंत्री कार्यालयाकडूनही विशेष कौतुक मिळाले आहे. एमकेसीएलच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त ‘एमएस-सीआयटीने केली किमया, दाखवली मला एआयची नवी दुनिया’ या थीमनुसार 100 हून अधिक AI टूल्सचा समावेश अभ्यासक्रमात करण्यात आला आहे.
कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी उपस्थित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले की, अशा कार्यशाळा प्रशासनातील कामकाजात सकारात्मक बदल घडवून आणतील आणि जनतेपर्यंत सेवा अधिक प्रभावीपणे पोहोचवता येईल.



